Raosaheb Danve Lunch With Party Workers
Raosaheb Danve Lunch With Party Workers Sarkarnama
मराठवाडा

रावसाहेब दानवेंच्या सभेला जाणे आणि घरच्या भाकरी खाणे ! गावोगावी डबा पार्टीची चर्चा..

तुषार पाटील

भोकरदन : आपल्याकडे `घरचे खाऊन लष्करात्या भाकऱ्या भाजणे`, ही म्हण प्रचलित आहे. ती एका वेगळ्या अर्थाने वापरली जाते. पण घरच्या भाकरी खाऊन पक्षा कार्याला वाहून घेण्याची जुनीच पण काहीशी मागे पडलेली संकल्पना भाजपमध्ये (Bjp) नव्याने रुजवण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे. केद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी जालना आणि औरंगाबाद या दोन जिल्ह्यातून `युवा मोर्चा, भाकऱ्या घरच्या`, अशी हाक देत केवळ युवा मोर्चाच नाही तर भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना पक्षाच्या मेळाव्यात घरून भाकऱ्या, डबा सोबत घेऊन येण्याचे आवाहन करत गोवोगावी डबा पार्ट्यांचे आयोजन सुरू केले आहे. (Marathwada)

राजकीय पक्षांचे मेळावे,बैठका म्हटले की चमचमीत खाणे, शाही थाट याची सवय लागलेल्या कार्यकर्त्यांना दानवे यांनी घरच्या भाकरीची देखील आठवण या निमित्ताने करून दिले असेच म्हणावे लागेल. युवा मोर्चा अन भाकरी घरच्या अशी अस्सल ग्रामीण ढंगातील दानवे यांची ही हाक युवा कार्यकर्त्यांना प्रेरित करत आहे.

या संदर्भात रावसाहेब दानवे यांनी भूमिका स्पष्ट करतांना सांगितले की,आमचा पक्ष हा जूना आहे, जेव्हा कुठल्याच सोयी सुविधा, सुबत्ता नव्हती तेव्हा पासून म्हणजे अगदी जनसंघ ते आताच्या भाजपपर्यंत सगळेच पक्ष कार्यासाठी बाहेर पडतांना सोबत आपल्या घरून भाकरी बांधून आणायचे. त्यामुळे पक्षासाठी झटतांना काम करतांना प्रत्येकाच्या मनात समर्पणाची भावना होती. कालांतराने पक्षाचा विस्तार झाला, गावपातळीवरचा पक्ष थेट दिल्लीच्या सत्तेत पोहचला आणि घरच्या भाकरीची प्रथा मागे पडली.

त्या जुन्या दिवसांची आणि समर्पण वृत्तीची आठवण आजच्या कार्यकर्त्यांना देखील असावी हा या उपक्रमा मागचा खरा हेतू आहे. त्यातूनच डबा पार्टीची संकल्पना नव्याने राबवण्याचा निर्णय माझ्या मनात आला. अगदी बूथ पातळीवरील कार्यकर्त्यापासून पक्षाचा मोठा नेता, मंत्री असला तरी तो सगळ्या सोबत एकत्र बसून घरच्या आणलेल्या भाकरी, पिठंल, ठेचा खातो. यातून संघ भावना वाढीस लागते असा माझा अनुभव आहे.

एखाद्या शेतातील झाडाच्या सावली खाली बसून सामाजिक, राजकीय विषयावर मंथन होते. वनभोजनाचा आनंद आणि राजकीय अनुभव, संघटनात्मक बांधणी, पक्षाची ध्येय धोरण, केंद्रातील सत्तेचा सामान्यपर्यंत पोहचणारा लाभ, त्यातील उणीवा आदी सगळ्याच विषयांवर या डबा पार्टातून सविस्तर चर्चा घडून येते. साधारण ऐंशीच्या दशकातील राजकारणी निवडणुकांच्या वेळेस अशा पद्धतीने डब्बा पार्टी करत असत.

मी स्वत: गेल्या ३५ वर्षापासून हा नियम पाळत आलो आहे. कितीही घाई, व्यस्थ दिवस असा माझा डबा सोबत असतो. रस्त्यात कुठेही गाडी थांबवून मी घरच्या भाकरी खातो. सोबतच्या कार्यकर्त्यांनाही खावू घालतो, असेही दानवे म्हणाले. राज्य पातळीवरच्या बैठकीत देखील आपल्याला हा उपक्रम राबवायचा आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यातील नेत्यांना डबा पार्टीचा उपक्रम भावला आहे. मला ते येण्याचा आग्रह धरतात, पण सगळीकडे जाणे शक्य नाही. त्यामुळे स्थानिक नेत्यांनी आपल्या पक्षाची ही जुनीच डबा पार्टीची परंपरा नव्याने रुजवावी, अशी अपेक्षा देखील दानवे यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT