Santosh Bangar, eknath shinde Sarkarnama
मराठवाडा

Santosh Bangar News : शासन आपल्या दारी, भल्याभल्यांना बसवलंय घरी; आमदार बांगरांची नवी घोषणा..

Political News : हिंगोलीमध्ये हा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी हिंगोलीचे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी जोरदार टोलेबाजी केली.

Jagdish Pansare

Hingoli News : लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती सरकारने अनेक जिल्ह्यांमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. रविवारी हिंगोलीमध्ये हा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी हिंगोलीचे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी जोरदार टोलेबाजी केली.

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उबाठा असा उल्लेख करत बांगर यांनी शासन आपल्या दारी, अन भल्याभल्यांना बसवलं घरी, अशी नवी घोषणा देत ठाकरे गटावर निशाणा साधला. महायुतीच्या शासन आपल्या दारी योजनेवर विरोधकांकाडून सातत्याने टीका केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात होऊ द्या चर्चा कार्यक्रमाच्या माध्यमातून शासन आपल्या दारी योजनेची पोलखोल करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर बांगर यांनी आपल्या भाषणात ठाकरे गटाला लक्ष्य करत हल्ला चढवला. शासन आपल्या दारी, काम करतयं भारी असं म्हणत बांगर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. विरोधकांनो मुख्यमंत्र्यांचा तुम्ही विरोध करा, पण नाद करायचा नाही. पायात काटा रुतला तर मुख्यमंत्र्यांच्या हदयात वेदना होतात. इतका संवेदनशील आणि २४ तास जनतेसाठी काम करणारा मुख्यमंत्री या राज्याला एकनाथ शिंदे यांच्या रुपाने मिळाला आहे.

उबाठा गटाचे काही चेले चपाटे मराठा समाजाला पुढे करून खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मुख्यमंत्री गाव, तांड्यांपर्यत सरकारी योजना पोचवण्यासाठी राज्यभर फिरत आहे. शासन हे आता फक्त घरापर्यंत नाही, तर गाव-खेड्यातील तांड्यावरच्या चुलीपर्यंत पोहचले आहे, असा दावाही बांगर यांनी केला. एकनाथ शिंदे हे खंबीर नेते आहेत, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याचा शब्द दिला होता. तो त्यांनी पूर्ण केला असून मराठा समाजाला कायदेशीर आणि टिकणारे आरक्षण दिले आहे.

उबाठाचे काही लोक मराठा समाजाला पुढे करुन विरोध करत आहेत. माझे त्यांच्या चेल्याचपाट्यांना आव्हान आहे, की जातीला समोर करू, नका तुमच्यात हिमंत असेल तर समोर या. उबाठा वाल्यांना आता दुसरा धंदा राहिलेला नाही, आपलं कसं याची त्यांना चिंता लागली आहे. असा टालोही बांगर यांनी लगावला.

काही दिवसापुर्वी आपण कृषी अधिकाऱ्याला शेतकऱ्यांच्या पीक विमा मिळावा म्हणून दम दिला होता. त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही त्या अधिकाऱ्याला फोन केला आणि शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला? ही शिवसेनेची ताकद आहे, असा दावा करतांनाच हिंगोलीवर भगवाच झेंडा फडकणार, असा विश्वासही बांगर (Santosh Bangar) यांनी व्यक्त केला.

SCROLL FOR NEXT