Raosaheb Danve  Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve: रावसाहेब दानवेंच्या जावयाचा पराभव; विटा ग्रामपंचायत अपक्षांच्या ताब्यात

Gram Panchayat Election Results Jalna : त्यांचा सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभव झाला.

Mangesh Mahale

Jalna : जालना जिल्ह्यात चार ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. चार वेगवेगळ्या ग्रामपंचायतींमध्ये चार जागांसाठी पोटनिवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकामध्ये शिंदे गटाला एक, तर काँग्रेसला दोन ग्रामपंचायतींवर विजय मिळवण्यात यश आलं आहे.

तर भोकरदन तालुक्यातील विटा रामनगर येथे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे मावस जावई यांचा पराभव झाला आहे. ज्ञानेश्वर पुंगळे असे त्यांचे नाव आहे. त्यांचा सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभव झाला. या ठिकाणी म्हणजे रामनगर विटा ही ग्रामपंचायत अपक्षांच्या ताब्यात गेली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अनेक ग्रामपंचायतीत विजय मिळवत पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केले आहे. कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघातील देवगड आणि कणकवलीमधील अकरापैकी आठ ग्रामपंचायती भाजपने, दोन ग्रामपंचायतीत ठाकरे सेनेने, तर एक ग्रामपंचायत ग्रामविकास आघाडीने मिळवली आहे.

या मतदारसंघात आमदार नितेश राणेंचं गेल्या काही दिवसांपासून वर्चस्व कायम राहिल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, दुसरीकडे मात्र कणकवली तालुक्यातील बेळणे ग्रामपंचायत निवडणूक भाजप व ठाकरे सेनेने प्रतिष्ठेची केली होती. यामध्ये बेळणे ग्रामपंचायत भाजपकडून हिसकावून घेण्यात ठाकरे सेनेला यश आले आहे.

येवला विधानसभा मतदारसंघात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मंत्री छगन भुजबळ यांचे वर्चस्व कायम राहिले. शिरसगाव लौकी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, लौकी शिरस ग्रामपंचायत सरपंचपदी प्रदीप कानडे, तर खैरगव्हान ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत समाधान सावंत देविदास पिंगट विजयी झाले आहेत.

इंदापूरच्या शिंदेवाडी व वकीलवस्ती ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता आली आहे. या निकालाने माजी मंत्री, भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांना धक्का बसला आहे. शिंदेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पल्लवी सौरभ झगडे विजयी झाल्या आहेत. शिंदेवाडी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासह सद्स्यांच्या ९ जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आल्या आहेत. वकीलवस्ती ग्रामपंचायतमध्ये वनिता बाळू भोसले सरपंचपदी विजयी झाल्या आहेत, तर वकीलवस्तीच्या नऊ सदस्यांपैकी सहा राष्ट्रवादी, तर तीन भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.

अमोल कोल्हेंना दणका

नारायणगाव ग्रामपंचायतमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सत्ता कायम राखली आहे. १७ पैकी १६ उमेदवार विजयी झाले असून, सरपंचपद हे ठाकरे गटाकडे आले आहे. राज्यात अजित पवार गट महायुतीत सहभागी झाल्यानंतर अमोल कोल्हे अजितदादांच्या शपथविधी कार्यक्रमात होते, पण नंतर त्यांनी भूमिका बदलली. ते शरद पवार गटाकडे असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमोल कोल्हेंचे गाव असलेल्या नारायणगावच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते, पण ठाकरे गटाने येथे बाजी मारली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT