Sandeep Kshirsagar , BharatBhushan Kshirsagar, Dhananjay Munde  Sarkarnama
मराठवाडा

Beed NCP Politics : बीडमध्ये राष्ट्रवादीच्या बांधणीपेक्षा 'गटबाजी'च मजबूत; क्षीरसागर पुतण्यांचं वर्चस्व मोडीत..?

Datta Deshmukh

Beed Political News : महाराष्ट्राच्या राजकारणात जुलै महिन्यात मोठा राजकीय भूकंप झाला. अजित पवारांसह काही आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची साथ सोडली. यानंतर अजितदादा थेट सत्तेत सहभागी झाले. राष्ट्रवादीतील या बंडखोरीनंतर बीड जिल्ह्यात केवळ आमदार संदीप क्षीरसागर हेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत राहिले. तर दुसरीकडे या मतदारसंघात अजित पवार गटाकडून नव्याने पक्षबांधणी केली जात आहे. पण याचवेळी पक्षात गटबाजीच अधिक उफाळून आल्याचे पाहायला मिळत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बीड शहरातील एका गटाची प्रवेशपूर्व बैठक मुंबईत झाली. या बैठकीत या गटाने अजितदादांसमोर बीडमध्ये आमचे स्वतंत्र अस्तित्व असणार असल्याची मुख्य अट ठेवली आहे.

या जिल्ह्यात राष्ट्रवादीचे चार आमदार होते. अजित पवार यांनी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभाग घेतल्यानंतर त्यांच्यासमवेत धनंजय मुंडे यांनाही मंत्रिपद मिळाले. नंतर आमदार प्रकाश सोळंके व आमदार बाळासाहेब आजबे यांनीही सत्तेची सोबत केली. आमदार संदीप क्षीरसागर(Sandeep Kshirsagar) यांनी पहिल्याच दिवशी शरद पवारांवर निष्ठा जाहीर करुन टाकली. त्यांना शरद पवारांनी पक्षाचे जिल्हाध्यक्षपदही दिले.

दरम्यान, अजित पवार(Ajit Pawar) गटाकडून बीड मतदारसंघात बांधणीला सुरुवात झाली. याचे नेतृत्व कृषिमंत्री धनंजय मुंडे व समन्वय माजी आमदार अमरसिंह पंडित करत आहेत. मात्र, बांधणी करताना पक्षात गटांचीच संख्या वाढत आहे. सुरुवातीला राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बबन गवते यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यांनी धडाक्यात मतदारसंघातील विकासाचे प्रश्नांची यादी, संपर्क सुरु केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उत्तरदायित्व सभेच्या तोंडावर डॉ. योगेश क्षीरसागर यांनी प्रवेश केला.

यानंतर बीड मतदारसंघात शहर - ग्रामीण अशी धुसफुस सुरु झाली. यानंतर आता संदीप क्षीरसागर पुतण्याकडून क्षीरसागर काकांकडे गेलेला बीडमधील एक गट आता पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. मात्र, या गटाने बीडमध्ये आता दुसऱ्या क्षीरसागर पुतण्याचे नेतृत्व अमान्य असेल आणि विकास कामांबाबत थेट एन्ट्री हवी अशा काही मागण्यावजा अटी श्रेष्ठींसमोर मांडल्या आहेत.

गुरुवारी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगीरी निवासस्थानी सांगोपांग चर्चेनंतर शहरातील बशीरगंज येथे सभा घेऊन प्रवेशावर शिक्कामोर्तत झाले. मात्र, सर्वांचेच आपापले गट आणि स्वतंत्र अस्तित्व यामुळे मतदार संघावर कमान कोणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अजित पवार यांच्यासह कृषिमंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde), माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्यासोबत प्रवेश चर्चेच्या बैठकीला उपस्थिती होती. ही मंडळी नगरपालिका कार्यक्षेत्रात कार्यरत आणि आपापला राजकीय वर्चस्व राखून असलेली आहे.

वरील मंडळींनी यापूर्वी क्षीरसागरांच्याच नेतृत्वात नगरपालिका क्षेत्रात काम केलेले आहे. काहींनी संदीप क्षीरसागर यांनी काकांना आव्हान दिल्यानंतर त्यांची साथ दिली. पुढे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या नेतृत्वात काम केले.

मात्र, आता राष्ट्रवादीची स्थापना आणि शहरातील डॉ. क्षीरसागरांची सूत्रे त्यांचे पुत्र योगेश क्षीरसागर यांनी हाती घेतल्यानंतर दोन्ही क्षीरसागर काकांकडे असलेली मंडळी दुरावली. त्यामुळेच या मंडळींनी डॉ. क्षीरसागरांसमवेत प्रवेश केला नाही. आता आम्ही राष्ट्रवादीत येऊ पण स्वतंत्र व क्षीरसागरांचे नेतृत्व नको अशी अट घातली आहे. त्यामुळे आता नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबतही पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT