Pune : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या बंडखोरीनंतर दिवसागणिक नवनवे आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दोन्ही गटांकडून धक्कादायक दावे - प्रतिदावेही केले जात आहेत. याचवेळी आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते आणि कर्जत - जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटावर गंभीर आरोप केले आहेत.
आमदारांची कामं करून देताना त्यांना ब्लॅकमेल केलं जातंय. विकासकामांसाठी निधी हवा आहे का? प्रतिज्ञापत्र दे असं सांगितलं जातं. सोप्या भाषेत याला ब्लॅकमेलिंग म्हणतात असं म्हणत अजित पवार गटावर हल्लाबोल केला होता. आता रोहित पवारांच्या आऱोपाला प्रत्युत्तर देताना मावळचे आमदार सुनील शेळके यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
अजित पवार गटाचे नेते व आमदार सुनील शेळके यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी आमदार रोहित पवारांच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला. शेळके म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आधी आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) भाजपमध्ये जाण्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. आता आम्ही सत्तेत गेल्यावर ते अजित पवारांची जागा घेऊ पाहताहेत, असं खळबळजनक विधान शेळके यांनी केलं आहे.
''...त्यामुळं त्यांनी आमचा स्वार्थ काढू नये !''
आमदार शेळके म्हणाले, एकनाथ शिंदेंनी 20 जून 2022 रोजी बंड केल्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे 22 जून 2022 चा तो दिवस होता. त्या दिवशी रोहित पवार पक्षातील मंत्री आणि नवीन आमदारांना घेऊन अजितदादांकडे गेले. मात्र, त्यांनी शरद पवारांची परवानगी आणायला सांगताच, रोहित पवार आम्हाला साहेबांकडेही घेऊन गेले, असा दावा त्यांनी केला आहे. रोहित पवारांनी आमचा स्वार्थ काढू नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
शेळके नेमके काय म्हणाले...?
20 जून 2022 ला एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि 22 जूनला आम्ही अजित पवारांच्या दालनात बैठक बोलवायला सांगितलं. त्यावेळी अजित पवारांनी सगळ्यांना बोलावून घेतलं. त्यावेळी बैठकीत मतदारसंघाची कामं करायचे असतील, तर आपल्याला सत्तेत राहिल्याशिवाय पर्याय नाही. याच बैठकीत ही सर्व चर्चा होत असताना रोहित पवारांनी त्यात आग्रही भूमिका घेतली होती. जर भाजप सत्तास्थापन करत असेल, तर आपण भाजपमध्ये सामील होऊया, अशी रोहित पवारांनी भूमिका घेतली होती.
आमदार सुनील शेळके(Sunil Shelke) म्हणाले, राष्ट्रवादी पक्ष हा फक्त पक्ष नसून तो एक परिवार आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून आमच्यावर अनेक आरोप केले जात आहेत. दोन महिने आम्ही सगळे आरोप ऐकत आहोत. राष्ट्रवादी हा परिवार आहे. त्यामुळे परिवारासारखं राहिलं पाहिजे. शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार घेत शरद पवार आणि अजित पवार आपापल्या पद्धतीने काम करत आहेत. सगळ्यांना न्याय कसा मिळेल, याचा विचार करून त्यासाठी प्रयत्न करत आहेत.
...ते अजितदादांची जागा घेऊ पाहताय !''
आता आम्ही सत्तेत गेल्यावर ते शरद पवारांच्या अधिक जवळ जाऊ पाहत आहेत. पण पवारसाहेबांच्या जवळचे दादा हे फक्त अजितदादाचं असू शकतात. अन्य कोणत्याही दादांना ते जमणार नाही, असं म्हणत रोहित पवार हे अजितदादांची जागा घेऊ पाहत असल्याचाही गौप्यस्फोट शेळेकेंनी केला.
एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदें(Eknath Shinde)चा अपमान केला जात आहे. दुसरीकडे मावळबद्दल बोलून अजितदादांना अडचणीत आणलं जात आहे. दोन्ही लोक नेत्यांचं अस्तित्व लोकसभेपर्यंत ठेवलं जाणार. त्यानंतर दोघांनाही संपवलं जाणार आहे. अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे दोघेही भाजपच्याच तिकिटावर लढतील, असं भाकीतच रोहित पवार यांनी केलं आहे.
याचवेळी त्यांनी निधीसाठी आमदारांकडून प्रतिज्ञापत्रांवर सह्या करून घेतल्या जात आहेत. त्यांना ब्लॅकमेल केलं जात आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. आमदारांची कामं करून देताना त्यांना ब्लॅकमेल केलं जातंय. विकासकामांसाठी निधी हवा आहे का? प्रतिज्ञापत्र दे असं सांगितलं जातं. सोप्या भाषेत याला ब्लॅकमेलिंग म्हणतात, असं रोहित पवार यांनी सांगितलं.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.