Ambadas Danve- Sanjay Shirsat News Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat-Ambadas Danve News : संजय शिरसाट यांचे कलेक्टर ऑफिसमध्ये संपर्क कार्यालय! अंबादास दानवे यांचा कडाडून विरोध

Guardian Minister Sanjay Shirsat sets up liaison office in the Collector Office, triggering opposition from Ambadas Danve : संपर्क कार्यालय उघडायची हौस असेल तर त्यांनी स्वतंत्र जागा घेऊन इतर ठिकाणी सुरू करावीत. जिल्हाधिकारी कार्यालयात अशा प्रकारचे कुठलेही कार्यालय खपवून घेणार नाही.

Jagdish Pansare

Shivsena News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याची सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हा कार्यालयात स्वतंत्र जागा मागून तिथे आपले संपर्क कार्यालय सुरू करण्याचा घाट घातला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही शिरसाट यांच्या संपर्क कार्यालयासाठी जागा आणि तीन अधिकारी व कर्मचारी देण्याचे मान्य केले आहे. यावरून आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील संपर्क कार्यालयाला कडाडून विरोध दर्शवला आहे. पालकमंत्री यांना संपर्क कार्यालय उघडायची हौस असेल तर त्यांनी स्वतंत्र जागा घेऊन इतर ठिकाणी त्यांना पाहिजे तेवढी कार्यालय सुरू करावीत. त्यामध्ये पाहिजे तेवढे कर्मचारी ठेवा, जिल्हाधिकारी कार्यालयात मात्र अशा प्रकारचे कुठलेही कार्यालय खपवून घेणार नाही. त्याला आमचा कडाडून विरोध असेल, असा इशारा दिला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय फक्त जिल्हाधिकारी यांच्यासाठी आहे. तिथे सर्वसामान्य जनतेची कामे अपेक्षित आहेत, इतर राजकीय कार्यालय तिथे उघडता कामा नये, असेही दानवे म्हणाले. दुसरीकडे संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मात्र सर्वसामान्य जनतेला कुठल्याही शासकीय कामासाठी मुंबईला फेऱ्या माराव्या लागू नयेत, या हेतूने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत माझे संपर्क कार्यालय सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले.

अनेकदा मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जिल्ह्यातील नागरिकांना मुंबईत खेट्या माराव्या लागतात. यासह इतर कुठल्याही शासकीय कामासाठी अर्ज किंवा पत्रव्यवहार स्थानिक पातळीवरच करता यावा यासाठीचे हे कार्यालय असणार आहे. येथील अधिकारी कर्मचारी जनतेकडून आलेल्या प्रत्येक अर्ज आणि पत्रव्यवहाराचा पाठपुरावा करतील. पालकमंत्री म्हणून मी स्वत: देखील यात लक्ष घालणार आहे, असे शिरसाट यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाने देखील जी जागा संजय शिरसाट यांना संपर्क कार्यालयासाठी उपलब्ध करून दिली आहे, तेथून फक्त शासकीय कामकाजच चालणार आहे. कुठलाही राजकीय पत्र व्यवहार किंवा काम तेथून चालणार नाही या अटीवरच पालकमंत्र्यांना कार्यालयासाठी जागा देण्यात आल्याचे स्पष्ट केले. एकूणच जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्र्याच्या संपर्क कार्यालयावरून शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT