Haribhau Bagde News Sarkarnama
मराठवाडा

Haribhau Bagde News : निवडणूक लढवणार नाही म्हणणाऱ्या हरिभाऊंशिवाय भाजपला पर्याय दिसेना; इच्छुकांच्या आशेवर फेरलं पाणी?

अय्यूब कादरी

Haribhau Bagde News : भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ (नाना) बागडे यांनी गेल्या वर्षी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य अनुराधा चव्हाण यांनी आयोजित केलेल्या दिवाळी मिलन कार्यक्रमात नानांनी ही घोषणा केली होती. त्यांची ही घोषणा सत्यात उतरणार नाही. कारण नानांसारखा दांडगा जनसंपर्क असलेला, मतदारसंघातील हजारो लोकांची नावे तोंडपाठ असलेल्या या नेत्याला भाजप आजच्या परिस्थितीत तरी निवृत्त होऊ देणार नाही, अशी चिन्हे आहेत. शिवाय ती घोषणा करून नानांनी आपल्या मागे कोण कोण इच्छिुक आहेत, याची चाचपणीही करून पाहिली होती. (Latest Marathi News)

हरीभाऊ बागडे यांनी विधानसभेचे अध्यक्षपदही भूषवले आहे. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून आपली कारकीर्द सुरू केली. १९८५ मध्ये त्यांनी विधानसभेची पहिली निवडणूक लढवली. त्यात ते विजयी झाले. त्यानंतर सलग चार वेळा ते विधानसभेत गेले. मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या युती सरकारमध्ये (१९९५ ते १९९९) ते मंत्री होते. ११ नोव्हेंबर २०१४ रोजी ते विधानसभेचे अध्यक्ष बनले. नाना या टोपण नावाने परिचित असलेल्या हरिभाऊ बागडे यांची त्यांच्या फुलंब्री मतदारसंघावर मजबूत पकड आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मतदारसंघातील सर्व थरांत असलेला त्यांचा दांडगा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यामुळे ७८ वर्षीय नानांनी निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला असला, तरी भाजप त्यांना तसे करू देणार नाही. राज्यातील सध्याचे राजकीय वातावरण पाहता नानांसारख्या नेत्यांची भाजपला अत्यंत गरज आहे. नानांना मतदारसंघातील हजारो लोकांची नावे तोंडपाठ आहेत, असे छत्रपती संभाजीनंगरमधील ज्येष्ठ पत्रकार सांगतात.

नानांची राहणी अत्यंत साधी आहे. धोतर, पांढरा सदरा आणि गांधी टोपी असा त्यांचा पेहराव असतो. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना ते आपले वाटतात. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे शाळेत असताना नानांनी पेपर विक्रीचे काम केले होते. त्यानंतर आमदार, मंत्री, विधानसभेचे अध्यक्ष अशी मजल त्यांनी मारली आहे. राजकारणात असले तरी नानांनी कधीही राजकारण केले नाही, ते गुणवत्तेला महत्त्व देतात, असे त्यांच्याबद्दल सांगितले जाते.

नानांनी गेल्यावर्षी निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर करताना हा माझा निर्णय आहे, पक्षाचा नाही, असेही स्पष्ट केले होते. पक्षाकडून येणाऱ्या आदेशाचे पालन करणार, सक्रिय राजकारणापासून दूर जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले होते. त्यानुसार नानांनी मतदारसंघात संपर्क कायम ठेवला आहे. नानांनी गेल्या वर्षी जाहीर केलेल्या निर्णयामुळे इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, त्या आशा तशाच राहण्याची शक्यता आहे. नानांचे वय पाहता गेल्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळणार नाही, अशी कुजबूज सुरू झाली होती. मात्र, पक्षाने नानांनाच पसंती दिली. २०२४ च्या निवडणुकीतही भाजप नानांनाच उमेदवारी देणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

नाना कडक शिस्तीचे, बारकाईने पाहणारे

नाना हे कडक शिस्तीचे, कोणत्याही बाबीकडे बारकाईने पाहणारे आहेत, असे छत्रपती संभीनगरमधील एक ज्येष्ठ पत्रकार सांगतात. त्यांचा साखर कारखानाही आहे. काही वर्षांपूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते त्यांच्याकडे आले आणि शिबिरासाठी दोन पोते साखरेची मागणी केली. नानांनी त्यांना विचारले, किती विद्यार्थी आहेत. त्यांनी शंभर-दीडशे असा आकडा सांगितला. नाना म्हणाले होते, मग दोन पोते साखरेचा पाक करून विद्यार्थ्यांना खाऊ घालणार आहात का? जितकी गरज आहे, तितकी साखर नानांनी त्यांना दिली होती. यावरून ते किती बारकाईने पाहतात, हे लक्षात येते.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT