Governor Haribhau Bagde Sarkarnama
मराठवाडा

BJP Politics : आधी अडसर ठरणाऱ्या बागडेंकडेच इच्छुकांची थेट राजस्थानला धाव..

Haribhau Bagde will take oath as Governor today : फुलंब्री विधानसभा मतदारसंघावर कायम बागडे यांचे बारीक लक्ष राहिले आहे. त्यामुळे त्यांच्या पश्चात आपला मतदारसंघ सुरक्षित हातात जावा, यासाठी ते नवा राजकीय वारस ठरवतांना काळजी घेणार यात शंकाच नाही.

Jagdish Pansare

नवनाथ इधाटे

Phulambri Assembly Constituency News : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हरिभाऊ बागडे यांना उमेदवारी मिळू नये म्हणून देव पाण्यात ठेवलल्या इच्छुकांचे देवाने ऐकले. हरिभाऊ बागडे यांची नुकतीच राजस्थानच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाली आणि त्यांनी पदभारही स्वीकारला. फुलंब्री विधानसभा मतदारसंघात बागडेनाना यांचा शब्द म्हणजे अंतिम मानणाऱ्या पण यावेळी विधानसभेला त्यांच्याऐवजी मला उमेदवारी मिळावी, अशी इच्छा बाळगून असलेल्या इच्छुकांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे.

राज्यपाल पदी नियुक्ती झाल्यानंतर केवळ फुलंब्रीच नाही तर संभाजीनगर जिल्हा आणि मुंबईतही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. फुलंब्रीतून विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येकाने बागडे यांचे स्वागत करत त्यांना महाराष्ट्रातून निरोप दिला. (Haribhau Bagde) बागडे राज्यपाल झाल्यामुळे उमेदवारी मिळवण्याच्या स्पर्धेतील मोठा अडथळा दूर झाल्याचा आनंद इच्छुकांच्या चेहऱ्यावर आहेच, पण आता फुंलब्रीतील उमेदवार बागडेनानाच ठरवणार हे ही स्पष्ट झाले आहे.

राज्यपाल सारख्या महत्वाच्या आणि मानाच्या पदावर पोहचल्यानंतर फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील कुठलाच निर्णय त्यांना विचारल्याशिवाय होणार नाही, याची जाणीव इच्छुकांना आता होऊ लागली आहे. त्यामुळे आधी अडसर ठरणाऱ्या बागडेनानांकडेच उमेदवारीसाठी इच्छुकांना लाॅबिंग करावे लागत आहे. यासाठी इच्छुकांनी आता थेट राजस्थान गाठत हरिभाऊ बागडे यांची भेट घेण्याचा धडाका लावला आहे.

फुलंब्री विधानसभा मतदारसंघावर कायम बागडे यांचे बारीक लक्ष राहिले आहे. त्यामुळे त्यांच्या पश्चात आपला मतदारसंघ सुरक्षित हातात जावा, यासाठी ते नवा राजकीय वारस ठरवतांना काळजी घेणार यात शंकाच नाही. (BJP) नानांचे मन जिंकणे एवढे सोपे नाही, याची जाणीव त्यांच्याबरोबर वर्षानुवर्षे काम केलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना चांगलेच माहित आहे. विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यावर आल्या आहेत.

त्यात हरिभाऊ बागडे आता राज्यपाल म्हणून राजस्थानला गेल्यामुळे तशी त्याची भेट दुर्मिळ होणार आहे. पण उमेदवारी मिळवायची तर नानांची संमती हवीच. त्यामुळे आतापासून इच्छुकांनी राजस्थानच्या वाऱ्या सुरू केल्या आहेत. आता नानांचा आशिर्वाद उमेदवारीसाठी कोणाला मिळतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मंगळवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन हरिभाऊ बागडे राजस्थान येथे राज्यपाल पदाची सूत्रे हाती घेण्यासाठी विशेष विमानाने रवाना झाले. आज त्यांच्या शपथविधी सोहळ्याला हजर राहण्यासाठी भाजपचे इच्छुक उमेदवार राजस्थान मध्ये दाखल झाले आहेत. मी बागडेनानांच्या किती जवळचा हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्यासोबतचे राजस्थानमधील फोटो सोशल मिडियावर व्हायरल करण्याची जणू त्यांच्यात स्पर्धाच लागली आहे.

सहा ते सात इच्छुक उमेदवार, दीडशेच्यावर पदाधिकारी व कार्यकर्ते सध्या राजस्थानला गेले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासाठी महायुतीमध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत. अशावेळी नानांकडून फुलंब्रीतील उमेदवारीवर मोहर उठवून घेण्याचा जो तो प्रयत्न करताना दिसतो आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT