Shivsena-BJP Politics : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर जिल्ह्यात भाजपने आपले वर्चस्व वाढवायला सुरूवात केली होती. लोकसभेच्या जागेवर दावा सांगत भाजपने पहिला प्रयत्न केला, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो यशस्वी होऊ दिला नाही.
उलट मराठवाड्यातील आठ पैकी एकमेव संभाजीनगरची (Chhatrapati Sambhajinagar) जागा निवडून आणत आपले नाणे खणखणीत असल्याचे दाखवून दिले. भाजपकडून संदीपान भुमरे आमच्यामुळे निवडून आले असा दावा केला असला तरी मराठा आरक्षणाचा विषय मराठवाड्यातील सात लोकसभा मतदारसंघात विरोधात गेला, तो संभाजीनगरात भुमरे यांच्या पथ्यावर कसा पडला? हे न कळण्या इतके भाजपचे नेते खुळे नाहीत.
मराठवाड्यातील एकमेव संभाजीनगरची जागा जिंकत शिवसेना शिंदे गटाने महायुतीची लाज राखली असेच म्हणावे लागेल. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात शहरातील मध्य, पश्चिम आणि ग्रामीण मधील वैजापूर मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत. संभाजीनगर पुर्व आणि गंगापूर मध्ये भाजपचे विद्यमान आमदार आहेत.
तर कन्नड मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. महायुतीतील शिवसेना-भाजप या दोन घटक पक्षाच्या ताकदीचा विचार केला तर शिंदे यांची शिवसेना (Shivsena) उजवी ठरते. लोकसभा निवडणुकीतील विजयाने या पक्षाचा आत्मविश्वास अधिकच वाढला आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिंदे गट आधीच्या तीन आणि ठाकरे गटाकडे असलेल्या कन्नड अशा एकूण चार विधानसभा मतदार संघावर दावा सांगण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचा जिल्ह्यात एकही आमदार नसला तरी एक जागा तरी मिळावी, यासाठी अजित पवार प्रयत्नशील असतील. त्यामुळे शिवसेना-भाजप पैकी कोण आपल्या हक्काच्या जागेवर पाणी सोडणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. लोकसभेत शिवसेनेचा खासदार, जिल्ह्याचे पालकमंत्री पद, सहा पैकी जिल्ह्यात तीन आमदार अशी शिवसेना शिंदे गटाची भक्कम बाजू आहे.
तर दुसरीकडे भाजपच्या वाट्याला जिल्ह्यात आलेली दोन केंद्रातील मंत्री पद आता राहिलेली नाही. रावसाहेब दानवे यांचा लोकसभेच्या जालना मतदारसंघातून पराभव झाल्याने त्यांच्याकडे असलेले रेल्वे-कोळसा आणि खाण मंत्रालयाचे राज्यमंत्री पद गेले. तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री असलेल्या डाॅ. भागवत कराड यांना नव्या सरकारच्या मंत्रीमंडळात स्थानच मिळाले नाही.
या सगळ्याचा परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो. कुठल्याही परिस्थितीत संभाजीनगरवर असलेली पकड ढिली होऊ द्यायची नाही, यादृष्टीने एकनाथ शिंदे जिल्ह्याची सुत्र हाताळत आहेत. पक्षीय बलाबल पाहता जिल्ह्यात शिंदे यांची शिवसेनाच मोठ्या भावाच्या भूमिकेत दिसते. तर केंद्रातील दोन मंत्री पद गमावल्यामुळे भाजप मात्र बॅकफूटवर गेल्याचे दिसून येते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.