Harshvardhan Jadhav
Harshvardhan Jadhav Sarkarnama
मराठवाडा

Harshvardhan Jadhav : उद्धव ठाकरेंसाठी प्रचंड भावुक झालो; पण निरोप आला, ‘नॉट इंटरेस्टेड...’ : हर्षवर्धन जाधवांनी सांगितली आतली गोष्ट

सरकारनामा ब्यूरो

छत्रपती संभाजीनगर : उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह गेल्यानंतर मी प्रचंड भावूक झाला होतो. भाजपच्या विरोधात एकत्र लढले पाहिजे, हीच भूमिका ठेवून मी माजी खासदार चंद्रकांत खैरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनाही निरोप दिले. मात्र, उत्तर आले की ‘नॉट इंटरेस्टेड’, असे कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी सांगितले. (Harshvardhan Jadhav's explanation on Shiv Sena entry)

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला. त्यानंतर बीआरसीमधील आपल्या प्रवेशाची भूमिका विशद करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्या वेळी त्यांनी शिवसेना प्रवेशासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.

जाधव म्हणाले की, ‘धनुष्यबाण’ चिन्ह गेल्यावर मी भावूक झालो. एवढा की, गेल्यावेळचे प्रतिस्पर्धी माजी खासदार खैरेंना सपोर्ट करण्यापर्यंत आलो. भाजपच्या विरोधात एकत्र लढले पाहिजे, हीच भूमिका यामागे होती. शिवाय उदयसिंह राजपूत यांनाही सपोर्ट करायला तयार झालो. तोही निरोप ठाकरेंना पोचवला. श्री. खैरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनाही निरोप दिले. मात्र, उत्तर आले कि ‘नॉट इंटरेस्टेड’, असे हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले. यासंदर्भात बबनराव घोलप यांच्यासोबत झालेल्या चर्चेची ऑडिओ क्लीपच त्यांनी माध्यमांना दिली.

शेतीसाठी २४ तास वीज, खरीप आणि रब्बीसाठी एकरी पाच हजार रुपयांचे अनुदान तसेच शेतकऱ्यांचा माल हमीभावाने सरकार घेते. त्यामुळे ५० टक्के लोकसंख्या असलेल्या शेतकऱ्यांमुळे जीडीपी वाढला आहे. त्यामुळे कर भरले जात आहेत. तो पैसा पुन्हा या प्रकारच्या योजनांवर खर्च होत आहे. म्हणूनच, सकारात्मक वर्तुळ तेलंगणात पूर्ण होऊ शकते, असे मत कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शुक्रवारी (ता. २४) पत्रकार परिषदेत मांडले. म्हणूनच बीआरएसमध्ये प्रवेश केल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

जाधव म्हणाले, ‘तेलंगणामध्ये मुंबईसारखे शहर नाही. तरीही २ लाख ७८ हजार कोटी रुपयांचे बजेट आहे. बजेटमधील ३० टक्के रक्कम कराव्यतिरिक्त येते. महाराष्ट्रात यंदा ९५ हजार कोटींच्या तुटीचे बजेट सादर झाले आहे. आपण अजून चार लाख कोटींवरच आहे. तेलंगणाची पद्धत महाराष्ट्राने अवलंबली तर, १० लाख कोटींवर बजेट जाईल.’

तेलंगणाचे मुख्यमंत्री सांगतील ते ऐकू. जालना लोकसभा असू दे किंवा कन्‍नड विधानसभा, जिथे सांगतील तिथे लढू. दोन्हीकडून एकाचवेळी बोलणी झाल्याने प्रवेश केला. मी कन्नड विधानसभेसाठी प्रयत्नशील असून लवकरच तिथे मुख्यमंत्री राव यांची सभा होईल, असेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT