Harshvardhan With Mulana At Iftar News Sarkarnama
मराठवाडा

Harshvardhan With Maulana At Iftar: आधी इम्तियाज यांना मदत, आता त्यांच्या विरोधकाला साथ..

Chhatrapati Sambhajinagar : जाधव यांनी मौलाना यांच्या आधीच बीआरएस पक्ष स्वीकारला होता.

Jagdish Pansare

Marathwada Politics : कन्नडे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) म्हणावे तर दुर्लक्षित पण तेवढेच महत्व असणारे व्यक्तिमत्व. आक्रमक स्वभाव आणि कुठल्याही एका निर्णयावर ठाम न राहणे हा त्यांचा गुणधर्म, तरी देखील उपद्रव मुल्य बाळगून असलेले माजी आमदार. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जाधव यांच्या उमेदवारीने शिवसेनेचा पराभव झाला आणि एमआयएमने बाजी मारली.

जाधव यांनी हिंदू मतांमध्ये मोठी फूट पाडत तब्बल २ लाख ८३ हजार मते मिळवली होती. त्यामुळे जाधव यांच्यामुळे मुस्लिम खासदार निवडून आला असा ठपका त्यांच्यावर कायम आहे.(Aimim) आता ज्या जाधव यांच्या बंडखोरीमुळे इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांना फायदा झाला आणि ते एमआयएमचे महाराष्ट्रातले पहिले खासदार झाले, त्यांच्याच कट्टर विरोधकाची साथ आता जाधव देत आहेत.

राष्ट्रवादीचे माजी प्रदेश उपाध्यक्ष आणि ज्यांनी नुकताच के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश केला ते कदीर मौलाना. मौलाना आणि खासदार इम्तियाज जलील यांच्यातून विस्तव देखील जात नाही. या दोघांमध्ये अनेकदा शहरात राडा झाल्याचे देखील दिसून आले. नुकत्याच झालेल्या किराडपुरा दंगलीमागे देखील या दोघांमधील वाद हेच कारण असल्याचा आरोप भाजपकडून केला जातोय.

तर हे कदीर मौलाना आणि हर्षवर्धन जाधव हे आता एकाच पक्षात आहेत. कदीर मौलाना हे राष्ट्रवादीचे शहरातील एक अल्पसंख्याक चेहरा म्हणून ओळखले जायचे. त्यांना पक्षाने एकदा मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीही दिली होती, पण ते पराभूत झाले. राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत उठबस एवढीच काय ते त्यांची ओळख राहायली होती. राष्ट्रवादीत आता आपले काही होणार नाही? हे लक्षात आल्यावर ते नव्या पक्षाच्या शोधात होते.

त्यांचा शोध बीआरएसपाशी येवून थांबला. दोन आठवड्यांपुर्वी कदीर मौलाना यांनी थेट हैदराबाद गाठत मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेत त्यांच्या पक्षात प्रवेश केला. तत्पुर्वी हर्षवर्धन जाधव यांच्यावर केसीआर यांचा आणि त्यांनी तेलंगणाता शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामाचा प्रभाव पडला होता. जाधव यांनी मौलाना यांच्या आधीच बीआरएस पक्ष स्वीकारला होता. आता या दोघांच्याही या प्रवेशाचा मेगा शो येत्या २४ एप्रिल रोजी शहरात होणार आहे.

केसीआर यांची सभा छत्रपती संभाजीनगरात होणार असल्याने सध्या जाधव आणि मौलाना एकमेकांना सातत्याने भेटतायेत. त्यात सध्या रमजान सुरू असल्याने मौलाना आणि जाधव यांनी एकत्र इफ्तार करत एकमेकांना घास भरवले. याचे फोटो सोशल मिडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

इम्तियाज जलील जेव्हा खासदार म्हणून निवडून आले तेव्हा हर्षवर्धन जाधव यांनी मतमोजणी केंद्रातच त्यांना कडकडून मिठी मारली होती. तेव्हा देखील याची चर्चा राज्यभरात झाली होती. आता त्याच इम्तियाज यांच्या कट्टर विरोधकाला जाधव घास भरवतांना दिसत आहेत. या दोघांची मैत्री आणि एकाच पक्षात झालेला प्रवेश याचे काय परिणाम येणाऱ्या काळात जिल्ह्याच्या राजकारणावर होतात ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT