Eknath Shinde On Nanded : Tanaji Sawant  Sarkarnama
मराठवाडा

Tanaji Sawant News : आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मोठी मागणी

Political News : धाराशिव येथील नव्या जिल्हा रुग्णालयाच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी करण्यात आले. जिल्हा रुग्णालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत दोघेही ऑनलाईन उपस्थित होते.

Sachin Waghmare

Dharashiv News: येत्या काळात लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन कुठल्या ही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या राज्यात सत्ताधारी मंडळींकडून विकासकामांच्या पूजनाचा धडाका सुरू आहे. धाराशिव येथील नव्या जिल्हा रुग्णालयाच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी करण्यात आले. धाराशिव जिल्हा रुग्णालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत दोघेही ऑनलाईन उपस्थित होते.

राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा शुक्रवारी वाढदिवस होता. त्यानिमित्ताने तानाजी सावंत यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी सावंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे एक मागणी केली. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ प्रतिसाद देत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. (Tanaji Sawant News )

सातत्याने मी कॅबिनेटमध्ये विषय आणायचा प्रयत्न करतोय. आज किंवा उद्यापासून निवडणुकीची अधिसूचना लागणार आहे. त्याच्यामुळे आज वाढदिवसाची भेट म्हणून मला एक वचन द्यावे. ही आचारसंहिता लागण्यापूर्वी किंवा लोकसभेची निवडणुका झाल्यानंतर आपण 'राईट टू हेल्थ' कायदा आणावा. हे महाराष्ट्राच्या सर्वसामान्य आणि गोरगरिबाच्या हिताचा आहे. कॅबिनेटमध्ये या विषयाला मंजुरी देत, महाराष्ट्रातील जनतेला आरोग्याचा कायदा द्यावा, अशी विनंती केली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी ही 'राईट टू हेल्थ' कायदा लवकरात लवकर आणण्याचे आश्वासन त्यांना दिले.

धाराशिव येथील कुष्ठधाम लगत असलेल्या शासकीय जमिनीवर 500 खाटांचे जिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी गेल्या तीन महिन्यापासून प्रयत्न करण्यात येत होते. धाराशिवचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी यासाठी मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांच्या माध्यमातून एशियन बँकेला प्रस्ताव पाठवून तो मान्य करून घेतला होता. त्या माध्यमातून हे रुग्णालय उभे राहत असून याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने कळ दाबून करण्यात आले.

'आमची मुलगी' या वेबसाईटचे ऑनलाईन उद्घाटन

यावेळी ऑनलाइन पद्धतीनेच राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) उपस्थित होते. धाराशिव येथील कार्यक्रमात आरोग्यसेवा परिमंडळच्या उपसंचालक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी हरीदास, शिवसेना सहसंपर्क नेते अनिल खोचरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. इस्माईल मुल्ला, मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी 'आमची मुलगी' या वेबसाईटचे देखील ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.

(Edited By : Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT