Vinayak Mete
Vinayak Mete Sarkarnama
मराठवाडा

फक्त गोड-गोड बोलून आणि धीर सोडू नका म्हणून भागणार नाही; मेटेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

सरकारनामा ब्यूरो

बीड : मराठवाड्यातील (Marathwada) अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे नदी - नाल्यांना पूर (Flood)आल्याने शेतकऱ्यांचे (Farmers)अतोनात नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे उभे पीक (Crop)वाहून गेले असून शेतात गुडघ्यापर्यंत पाणी साचून जमिनीवर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) केवळ गोड बोलतात आणि धीर सोडू नका म्हणतात. यामुळे शेतकऱ्यांचे भागणार नाही, असा टोला शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे (Vinayak Mete)यांनी मुख्यंमंत्री ठाकरे यांना लगावला.

मेटे यांनी शनिवारी (ता.२ ऑक्टोबर) बीड तालुक्यातील घोडका राजूरी येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा, सॅटलाईटद्वारे उपलब्ध असलेल्या नुकसानीच्या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना तत्काळ मदतीची घोषणा करावी. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पुरामुळे खरडून गेलेल्या जमिनी चार - पाच वर्षे तरी व्यवस्थित होणार नाही, अशी परिस्थिती आहे. खोलीकरण नसल्यामुळे पाणी शेतात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.

तालुक्यातील घोडका राजुरी येथील मुख्य रस्त्यावरील पूल वाहून गेला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना खुप अडचणी येत आहेत. या परिसरात मेटे यांनी भेट देऊन पाहणी केली. शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने ते बैलगाडीतून तेथे पोचले. दोन वर्षांपूर्वी आपण हा पुल नाबार्ड अंतर्गत मंजूर करून दिड कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला होता. मात्र, महाविकास आघाडी सरकारने काम रद्द केल्याचा आरोपही त्यांनी केला. काम रद्द केले नसते तर, पूल पूर्णत्वास गेला असता व ग्रामस्थांना त्रास सहन करण्याची वेळ आली नसती, असे मेटे म्हणाले.

शेतकऱ्यांना आधाराची गरज आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने तत्काळ मदतीची घोषणा करणे अपेक्षीत आहे. पावसामुळे राज्यात प्रचंड शेती आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. तर, अनेकांना आपला जीव गमवावा लागला. यावर्षी सातत्याने अतिवृष्टीमुळे राज्यात 436 नागरिकांना जीव गमवावा लागला असून लागला. जनावरे वाहून गेल्याच्या घटना घडल्या. मुख्यमंत्र्यांनी ही परिस्थिती गांभीर्याने घेऊन तत्काळ मदतीची घोषणा करायला हवी, शासनाकडे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचा सॅटॅलाइट डाटा उपलब्ध आहे, नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा त्यांना थेट मदत दिली पाहिजे. असे मेटे म्हणाले. यावेळी सुधीर काकडे, रामहारी मेटे, नवनाथ प्रभाळे, सुनील शिंदे, ज्ञानेश्वर कोकाटे, राजेंद्र आमटे, राजेंद्र माने, सुनील कुटे, महादेव बागलाने, डॉ. राजेंद्र बंड, विनोद कवडे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT