सुधाकर दहिफळे
Latur News : पानगाव (ता. रेणापूर) येथील पन्नगेश्वर शुगर मिल्स लिमिटेड हा साखर कारखाना यावर्षी बंद असल्यामुळे या परिसरातील ऊस घेऊन जाण्यावरुन गेल्या काही दिवसांपासून चांगलेच राजकारण रंगले आहे. रेणापूर तालुक्यात दोन साखर कारखाने आहेत. मात्र, रेणा कारखान्याकडून ऊस नेला जात नसल्याने उजना (ता. अहमदपूर) येथील सिद्धी शुगर हा साखर कारखाना पानगाव परिसरातून ऊस गाळपासाठी घरून जात असल्याने शेतकरी व सभासदांना दिलासा मिळाला आहे.
पानगाव येथील पन्नगेश्वर कारखाना (pangeshvar sugar factory) यावर्षी बंद आहे. त्यामुळे उजना (ता. अहमदपूर) येथील सिद्धी शुगर हा साखर कारखाना पानगाव परिसरातून ऊस गाळपासाठी घेऊन जात असल्यामुळे पन्नगेश्वरच्या सभासदांना सिद्धी कारखान्याचा आधार मिळाला आहे. यामुळे ऊस गाळपास जात आहे.
रेणापूर तालुक्यात दोन साखर कारखाने आहेत. पानगाव येथे पन्नगेश्वर हा खासगी तर निवाडा येथे रेणा सहकारी साखर कारखाना (rena sugar factory) आहे. पानगाव परिसरात पन्नगेश्वरचे सभासद मोठ्या प्रमाणात आहेत. यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाला. भंडारवाडी येथील रेणा मध्यम प्रकल्पातील पाणी प्रशासनाने पिण्यासाठी आरक्षित केले. यात पन्नगेश्वर कारखाना बंद राहिला.
गेल्यावर्षी रेणा कारखान्याने सर्वाधिक २ हजार ९५१ रुपये भाव दिल्यामुळे ऊस देण्याची तीव्र इच्छा असतानाही उशीराने चाललेला ऊसतोड कार्यक्रम पाणी नसल्यामुळे हतबल झालेला शेतकरी अन २१ शुगरचे या भागात सभासद असूनही या कारखान्याचे या परिसराकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे ऊस उत्पादक चिंतेत होते.
यात सिद्धी कारखान्याने ही अडचण लक्षात घेऊन कारखाना सुरु झाल्यानंतर एक हार्वेस्टर पानगाव परिसरातील गावासाठी दिले. यामुळे फावडेवाडी, पानगाव, तळेगाव, वाला, भंडारवाडी या परिसरातील पन्नगेश्वरच्या सभासदांचा ऊस गाळपासाठी सिद्धी शुगरला जात आसल्यामुळे पानगाव परिसरातील पन्नगेश्वरच्या सभासदांना सिद्धीचा आधार मिळाला आहे.
आजपर्यंत सात हजार मेट्रीक टनापेक्षा अधिक ऊस गाळपास गेल्याचे हार्वेस्टरचे मालक बाबासाहेब केंद्रे यांनी सांगितले. नळेगाव (ता. चाकूर) येथील शुगर केन मास्टर या गुळ पावडर कारखान्याने पानगाव परिसरातून दोन हजार मेट्रीक टन ऊस गाळपास नेला आहे. गतवर्षी रेणा कारखाना २९५१ रुपये, २१ शुगरने २४०० रुपये तर पन्नगेश्वर शुगरने २३०० रुपये उसाला दर दिला होता.
पानगाव व परिसरातील अनेक शेतकरी ट्वेंटी वन या खासगी साखर कारखान्याचे सभासद आहेत. गतवर्षी कारखान्याने भाव कमी दिल्यामुळे सभासद नाराज आहेत. परंतु यावर्षी दुष्काळी परिस्थीती असल्यामुळे अनेकांनी कारखाना व्यवस्थापनाशी, शेतकी विभागाशी संपर्क साधला. पण त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. विविध कारणे सांगून सभासदांना टाळले जात आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी निराश झाले आहेत. याचा परिणाम येत्या निवडणुकीत होऊ शकतो.
सुरवातीला आम्ही वाहने टाकली. परंतु शेतक-यांनी प्रतिसाद दिला नाही. यामुळे आम्ही अंबाजोगाई, निलंगा, अहमदपुर परिसरात वाहने टाकली तेथेही आमच्या कारखान्याचे सभासद आहेत. कर्नाटकमधून यंत्रणा मागवली असून पानगाव परिसरात दोन हार्वेस्टर देणार आहोत, असे २१ शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख यांनी सांगितले.