Nanded MLC Election 2026 : नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत महायुती असली तरी मित्रपक्षांमध्ये मतभेद असल्याचे दिसून आले होते. महायुतीने अमर राजूरकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेनेचे नेते गायब होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेतही शिवसेनेचे कोणीच नव्हते.
महायुतीचे उमेदवार अमर राजूकर, भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनीही शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांना वगळून बाबुराव कदम, आनंद बोंढाकर, बालाजी कल्याणकर यांना सोबत घेत प्रचार, भेटीगाठी सुरू केल्या आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीपासून अंतर राखून असलेल्या आमदार हेमंत पाटील यांनी 'कोळशाच्या दलालीत आपल्याला हात काळे करायचे नाहीत' असे म्हणत महाराष्ट्र्च्या राजकारणाचा चुथडा झाला आहे, असा घरचा आहेर पक्षाला आणि महायुतीला दिला.
काल सोबत असलेली व्यक्ती आज कोणासोबत असेल हे सांगता येत नाही, असे म्हणत महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील नेते आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे अशोक चव्हाणांच्या सोबत गेले, याकडे हेमंत पाटील यांनी लक्ष वेधले.
नांदेड विधान परिषदेची निवडणूक एकतर्फी होणार आहे. कारण निवडणुकीची सगळी सूत्र ही पैशाच्या जोरावर हलवली जातात. मराठी माणूस आता विधान परिषदेसारख्या निवडणुका लढवू शकत नाही, त्यांची तेवढी आता पत राहिलेली नाही, अशी उद्विग्नता पाटील यांनी व्यक्त केली. नांदेडमध्ये आतापर्यंतचा इतिहास आहे, इथे कोणतीही निवडणूक लढली जात नाही, ती मॅनेज केली जाते, असा आरोपही हेमंत पाटली यांनी केला.
या सगळ्या गोष्टींचा मला कंटाळा आला आहे, त्यामुळे मी विधान परिषदेच्या निवडणुकीपासून अलिप्त आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार हा अपक्ष आहे, त्याला आता इतर पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. मात्र हा फक्त आपली बार्गेनिंग पावर वाढवण्यासाठी केलेला खटाटोप आहे. नांदेडच्या निवडणूकीचा निकाल हा नेहमीप्रमाणे ठरलेला असतो, असा दावाही हेमंत पाटील यांनी केला आहे.
राज्यात सर्व सतरा विधान परिषदेच्या निवडणुका या महायुतीत लढण्याचा निर्णय आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे. त्याचे आम्ही पालन करू, मी स्वत: मात्र या निवडणूकीपासून अलिप्त राहणार असल्याचे हेमंत पाटील यांनी सांगीतले. महाविकास आघाडीच्या उमेदवाराने तुमच्याशी संपर्क साधला का? यावर अजून तरी नाही बाकी महायुती की महाविकास आघाडी याचा फैसला शिवसेनेच्या त्या त्या मतदारसंघातील आमदारांनी घ्यायचा आहे, असेही हेमंत पाटील म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.