Bombay High Court Bench News
Bombay High Court Bench News Sarkarnama
मराठवाडा

High Court News : शिंदे सरकारचे स्थगिती आदेश रद्द, आघाडीच्या काळातील विकास कामे पूर्ववत करा..

सरकरनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar : राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळातील मंजूर कामे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सरकारने रद्द केली होती. या संदर्भात दाखल याचिकेत खंडपीठाने सध्याच्या शिंदे फडणवीस सरकारने दिलेले स्थगिती आदेश रद्द ठरवत, महाविकास आघाडी शासनाने अर्थसंकल्पामध्ये मंजूर केलेली कामे पूर्ववत करावीत व त्या दृष्टीने निर्णय घ्यावेत असे स्पष्ट आदेश खंडपीठाने दिले आहेत.

राज्यातील तत्कालीन (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडी सरकारने २०२१-२२ व २०२२-२३ या वर्षातील अर्थसंकल्पात मंजूर केलेली आणि प्रशासकीय व तांत्रिक मान्यता दिलेले तसेच कार्यारंभ आदेश दिलेल्या विकासकामांना शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर तात्काळ स्थगिती दिली होती. (High Court) ही स्थगिती विविध विकासकामे व लोकप्रतिनिधींनी सूचवलेली कामे यांना देण्यात आली होती.

त्यामुळे मंजूर झालेली विकासकामे राज्यभरात ठप्प झाली होती. शासन निर्णयाच्या विरोधात अंबड, घनसावंगी, जालना तालुका आणि हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका येथील लोकप्रतिनिधींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ॲड. संभाजी टोपे यांच्यामार्फत रिट याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये यापूर्वीच मंजूर कामांना रद्द करू नये असे अंतरीम आदेश न्यायालयाने दिले होते.

त्यानंतर याचिकांमध्ये सुनावणी पूर्ण झाली. तसेच शासनातर्फे म्हणणे मांडण्यात आले. रिट याचिका निकालासाठी राखून ठेवण्यात आल्या होत्या. त्यावर शुक्रवारी (ता. तीन) अंतिम आदेश देण्यात आले. सर्व कामे अर्थसंकल्पात मंजूर असून, दोन्ही सभागृहांच्या व राज्यपालांच्या मान्यतेने मंजूर झालेल्या कामांना राज्यघटनेनुसार स्थगिती देता येत नाही, अशा प्रकारची बाजू मांडण्यात आली.

शासनाच्या कार्यपद्धतीच्या नियमानुसार महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील किंवा रद्द करायचे असतील तर मंत्रिमंडळाची बैठक होऊन ठराव होणे गरजेचे आहे. महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेली कामे स्थगित करताना कायदेशीर प्रक्रिया पार पाडली नाही, असे निवेदन न्यायालयात करण्यात आले. वसमतचे आमदार राजू नवघरे, जालना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश टोपे, पूजा कल्याण सपाटे आदींनी याचिका दाखल केल्या आहेत.

याप्रकरणी राज्याच्या मुख्य सचिवांसह नियोजन, ग्रामविकास, आदिवासी, नगरविकास, मृद व जलसंधारण विभागाच्या सचिवांना नोटीस बजावली होती. हा आदेश राज्यभर लागू नसून केवळ रिट याचिकेमध्ये आव्हानित कामांपुरतेच लागू असल्याचे ॲड. संभाजी टोपे यांनी सांगितले. राज्य सरकारतर्फे मुख्य सरकारी वकील ज्ञानेश्वर काळे यांनी बाजू मांडली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT