Political News Sarkarnama
मराठवाडा

Hingoli News : राजीनामा देण्यास पतीकडून मारहाण; ग्रामसभेत सरपंचानी मांडली आपबीती

Mangesh Mahale

Hingoli News: देशात महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्यासाठी सरकारने कायदा लागू केला. मात्र, या कायद्याची अंमलबजावणी सुरू होण्याआधीच त्याची पायमल्ली होत असल्याचा धक्कादायक प्रकार हिंगोली जिल्ह्यात घडला आहे. ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत स्वतः सरपंचाने खुलासा करत सरपंच पदाचा राजीनामा देण्यास दबाव टाकणाऱ्या पतीवर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

17 हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या हिंगोली तालुक्यातील गोरेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच गंगूबाई कावरखे यांना पतीने मारहाण करत सरपंच पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले आहे. या प्रकाराबाबत गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, गोरेगावमधील नागरिकांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण मागील अडीच वर्षांपासून गोरेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर विराजमान आहोत, यापुढेदेखील गावात विकासात्मक कामे करण्यासाठी मला सरपंचपदी पूर्ण कार्यकाळ होईपर्यंत कर्तव्य पार पाडायचे आहे. त्यामुळे पतीच्या दबावापोटी आपण दिलेल्या राजीनामा नामंजूर करावा, अशी विनंती गंगूबाई कावरखे यांनी केली. यानंतर आता प्रशासनाने हा राजीनामा नामंजूर केला आहे.

या प्रकारानंतर गोरेगावसह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. महिला सरपंचाला मारहाण करत राजीनाम्यासाठी दबाव आणणाऱ्या सरपंचाचे पती रामराव कावरखे यांच्या विरोधात तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी गोरेगावमधील ग्रामस्थांनी केली आहे. राज्याच्या महिला आयोगानेदेखील या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कार्यवाही करण्याची मागणी गोरेगावमधील महिला ग्रामस्थांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT