uddhav thackeray, Nagesh Aashtikar  sarkarnama
मराठवाडा

Hingoli Lok Sabha Constituency : हिंगोलीचे मतदार मोठ्या मनाचे, पण गद्दारी खपवून घेत नाहीत..

Shivsena Politcal News : हिंगोली मतदारसंघाचा इतिहास बघितला तर येथील मतदारांनी बाहेरचा-घरचा असा भेद कधी केला नाही. राजकीय पक्षाने जो उमेदवार दिला, त्याला डोक्यावर घेऊन निवडून पाठवले.

Jagdish Pansare

Hingoli News : लोकसभेच्या हिंगोली मतदारसंघात एकनिष्ठ विरुद्ध गद्दार असा प्रचार यावेळी झाला. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदेंची सेना आणि उद्धव ठाकरेंची सेना एकमेकांसमोर उभे आहेत. हिंगोली मतदारसंघाचा इतिहास बघितला तर येथील मतदारांनी बाहेरचा-घरचा असा भेद कधी केला नाही. राजकीय पक्षाने जो उमेदवार दिला, त्याला डोक्यावर घेऊन निवडून पाठवले. पण पक्षाशी अन् मतदारांशी गद्दारी करणाऱ्यांच्या कपाळी येथील मतदार कधीच विजयाचा गुलाल लागू देत नाही हे निश्चित आहे.

हिंगोली मतदारसंघावर पूर्वी काँग्रेस (congress) आणि त्यानंतर शिवसेना (shivsena) पक्षाचा पगडा राहिला आहे. 1977 ते 2019 पर्यंत झालेल्या बारा निवडणुकीत येथे काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना समान संधी मिळाली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) सूर्यकांता पाटील (Suryakanta Patil) यांनाही हिंगोलीकरांनी एकदा दिल्लीवारी घडवली होती. जनता पक्षापासून विजयाची झालेली सुरूवात आता 2024 मध्ये शिंदेंची शिवसेना की उद्धव बाळासाहेब ठाकरेंची यावर येऊन ठेपली आहे. (Hingoli Lok Sabha Constituency News)

गेल्या पंधरा वर्षातील निकालावर नजर टाकली तर पक्ष सोडून गेलेल्या उमेदवारांना हिंगोलीच्या मतदारांनी धूळ चारल्याचे दिसून आले आहे. यवतमाळ, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील काही भाग मिळून हा मतदारसंघ तयार झालेला आहे. जातीची समीकरणे येथे नेहमीच महत्वाची ठरली आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांनी या गोष्टी लक्षात ठेवूनच उमेदवार दिले.

2009 मध्ये शिवसेनेचे सुभाष वानखेडे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूर्यकांता पाटील यांचा 73 हजार 634 मतांनी पराभव करून निवडून आले होते. 2014 मध्ये काँग्रेसचे राजीव सातव आणि वानखेडे यांच्यात अटीतटीची लढत झाली आणि त्यात अवघ्या 1 हजार 629 मतांनी शिवसेनेचा पराभव झाला. 2019 मध्ये पक्षाने भाकरी फिरवण्याचा निर्णय घेत वानखेडे यांच्याऐवजी हेमंत पाटील यांना उमेदवारी दिली अ्न शिवसेनेने ही जागा पुन्हा 2 लाख 77 हजार 856 मताधिक्याने जिंकली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या मताधिक्यामागे वानखेडे यांनी शिवसेना पक्ष सोडून काँग्रेसकडून निवडणूक लढवणे हे प्रमुख कारण होते. शिवसेनेकडून खासदार राहिलेल्या वानखेडे यांनी उमेदवारी मिळाली नाही म्हणून थेट काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती. याबद्दलचा राग मतदारांनी मतपेटीतून व्यक्त केल्याचे दिसून आले होते. या मतदारसंघाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे येथे एकदा निवडून आलेल्या उमेदवाराला मतदार दुसऱ्यांदा संधी देत नाहीत. त्यामुळेही राजकीय पक्षांकडून प्रत्येक निवडणुकीत नवे प्रयोग केले जातात.

यंदाच्या निवडणुकीत राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी या दोन पक्ष फुटीचा मोठा परिणाम होणार आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र उमेदवार दिल्यामुळे येथे तिरंगी लढत झाली.

महायुतीचे बाबुराव कदम कोहळेकर विरुद्ध महाविकास आघाडी शिवसेनेचे नागेश पाटील आष्टीकर असा थेट सामना झाला. परंतु, या मतदारसंघातील बंजारा मतदारांची संख्या लक्षात घेता वंचितचे डाॅ. बी. डी. चव्हाण निर्णायक ठरू शकतात. यावेळी हिंगोलीचा मतदार कोणाला विजयाचा गुलाल लावतात, हे चार जूनच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.

(Edited By : Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT