Hingoli Political News : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीने एकमेकाविरुद्ध दंड थोपटले आहेत. मात्र भाजपा शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षासह एकूण 14 घटक पक्ष असलेल्या महायुतीमध्ये आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार -शिवसेना उबाठा गट यांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच चालू आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी असताना हिंगोली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे असायचा.
राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघ शिवसेना उबाठा गटाकडे जाण्याची शक्यता आहे. शिवसेना-भाजपा युती असताना राज्यातील अनेक लोकसभा मतदारसंघात वर्षानुवर्षे एकतर शिवसेना किंवा भारतीय जनता पक्षाने निवडणूक लढविलेली होती. तसेच काँग्रेस राष्ट्रवादी युती असताना दोन्ही पक्षांचे पारंपारिक मतदारसंघ तयार झाले होते. मात्र राज्यातील राजकीय परिस्थितीत मोठा बदल झाला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भारतीय जनता पार्टी, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार व शिवसेना उबाठा गट यांची महाविकास आघाडी अस्तित्वात आली. यामुळे सर्वच राजकीय पक्षांना आजपर्यंत न लढवलेल्या लोकसभा मतदारसंघात निवडणूकीच्या मैदानात ताकद आजमावण्याची संधी उपलब्ध झाली. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी असताना हिंगोली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे असायचा.
2014च्या लोकसभा निवडणुकीत देशभर मोदी लाट असताना काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघात विजय प्राप्त करून राज्यात पक्षाची लाज राखली होती. सातव यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनी राजकीय वारसा पुढे नेला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी हिंगोली लोकसभा मतदारसंघातून त्यांनी तयारी चालू केली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे हेमंत पाटील यांनी विजय मिळवला होता.
शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली. महायुतीच्या जागा वाटपात हिंगोली लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना उबाठा गटाने हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही मागणी केली आहे. मूळचे शिवसैनिक असलेले सुभाष वानखेडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर त्यांनी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. शिवसेना उबाठा गटाकडून इच्छुकांच्या यादीत त्यांचे नाव अग्रक्रमावर आहे.
तसेच पक्षाशी एकनिष्ठ असलेले माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा हे सुद्धा प्रबळ दावेदार मानले जातात. शिवसेना उबाठा गटाकडून ही निवडणूक निष्ठावंत विरुद्ध गद्दार या मुद्द्यावर केंद्रित केल्याने पक्षाशी निष्ठावंत असलेल्या शिवसैनिकाला पसंती मिळण्याची अधिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये काही मतदारसंघाची अदलाबदल होऊ शकते, अशी चर्चा आहे.
त्यात काँग्रेसने जालन्याच्या बदल्यात हिंगोली लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता. अगदी अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये असतांनापासून तसे प्रयत्न सुरू होते. परंतु आता काँग्रेसचा हिंगोलीवरचा दावा मागे पडल्याचे दिसते. कारण जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवार देण्याची पुर्ण तयारी काँग्रेसने केली आहे. त्यामुळे हिंगोलीची जागा उद्धव ठाकरेंची शिवसेनाच लढवणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिवसेनेचा धनुष्यबाण विरुद्द शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशाल, अशी थेट लढत हिंगोलीत पहायला मिळण्याची शक्यता आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.