Marathwada Political News : लोकसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते, यादृष्टीने राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. एकाच मतदारसंघात महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे गट) राष्ट्रवादी (शरद पवार गट) काँग्रेस अशा तीनही घटक पक्षांनी दावे करण्याचे प्रकारही समोर येत आहेत. (Hingoli Loksabha Constituency News) महाविकास आघाडीप्रमाणेच महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट) राष्ट्रवादी अजित पवार गट हेही एकाच मतदारसंघावर दावा सांगत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात जेव्हा जागावाटप होईल तेव्हा कोणता मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हिंगोली (Hingoli) लोकसभा मतदारसंघात सध्या सगळ्याच पक्षांच्या इच्छुकांची गर्दी होताना दिसते आहे. विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनी बंड पुकारत शिंदे गटात प्रवेश केल्याने त्यांच्याविरोधातील वातावरणाचा लाभ उठवण्यासाठी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) तीनही पक्ष सज्ज झाले आहेत. दरम्यान, पुढील महिन्यात होणाऱ्या संसदेच्या शेवटच्या हिवाळी अधिवेशनात भाजपच्या संभाव्य खासदारांना उमेदवारीबाबतीत आदेश दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे.
नांदेड, हिंगोली व यवतमाळ अशी लोकसभा मतदारसंघांची व्याप्ती असलेल्या हिंगोली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे अनेकांना डोहाळे लागले आहेत. (BJP)भाजप, शिवसेना (ठाकरे गट,) शिवसेना (शिंदे गट) काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या प्रमुख पक्षांकडे सक्षम असे उमेदवार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात जागावाटपाचा मुद्दा कळीचा ठरणार आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक इतिहास पाहता गेल्या पाच निवडणुकीत विद्यामान खासदार दुसऱ्यांदा निवडून आलेला नाही.
या मतदारसंघात भाजपची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील तीनही घटकपक्ष या जागेवर दावा करत असल्याने डोकेदुखी वाढली आहे. शिवसेना ठाकरे गटाचा या जागेवर प्रबळ दावा असणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, माजी खासदार सुभाष वानखेडे हे प्रमुख नेते दावेदार आहेत. हेमंत पाटील यांनी शिवसेना सोडून शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये मोठा रोष आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूतीचे वातावरण असल्याने याचा फायदा शिवसेना ठाकरे गटाला होऊ शकतो.
काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी या जागेसाठी आग्रही असून, या पक्षाची फिक्स व्हाेटबॅंक असल्याने ही जागा काँग्रेसला सोडण्यात यावी, अशी मागणी होत आहे. डॉ. अंकुश देवसरकर यांनी तयारी सुरू केली असून, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या संपर्कात ते आहेत. याशिवाय आजी- माजी आमदारही उमेदवारीची अपेक्षा बाळगून आहेत. राष्ट्रवादीने (शरद पवार गट) या जागेवर आपला दावा सांगितला आहे.
विद्यमान खासदार हेमंत पाटील हे शिंदे गटात गेले असून, त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून नुकताच आपल्या खासदारकीचा राजीनामाही दिला होता. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात तो मंजूर होणार की नाही? हे स्पष्ट होईल. ही जागा शिंदे गटाला सुटल्यास खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. भारतीय जनता पक्षाचे राज्यात मिशन ४५ प्लस सुरू आहे. त्यांच्यासाठी एक एक जागा महत्त्वाची आहे. या मतदारसंघात गेल्या दोन वर्षांपासून रामदास पाटील सुमठाणकर यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असून, मतदारसंघात संपर्क वाढविला आहे.
ज्येष्ठ नेते माजी सहकारमंत्री जयप्रकाश दांडेगावकर हे सक्षम उमेदवार होऊ शकतात. त्यांनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली असून, ते शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार गट) सुटली, तर जयप्रकाश दांडेगावकर हे उमेदवार असतील. इच्छुकांची संख्या अधिक असली तरी महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि युतीमध्ये शिंदेंची शिवसेना हेच दोन प्रमुख दावेदार असणार आहेत. त्यामुळे २०२४ मध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत पाहायला मिळाली, तर नवल वाटायला नको.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.