Hemant Patil Sarkarnama
मराठवाडा

Hingoli Lok Sabha Constituency: शाखाप्रमुख ते खासदार; हेमंत पाटील हिंगोलीतून दुसऱ्यांदा विजय मिळवणार ?

Hingoli Political News : खासदार हेमंत पाटील यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकारणात दबदबा निर्माण केला.

Laxmikant Mule

Loksabha Election 2024 : शिवसेनेचा विस्तार मुंबई, ठाणेनंतर छत्रपती संभाजीनगरात झाला. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत शिवसेनेचे जाळे पसरले आणि अगदी साधी माणसेही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी भारावून शिवसैनिक म्हणून अभिमानाने मिरवू लागली. भगवा झेंडा खांद्यावर घेऊन शिवसेनेत दाखल होणाऱ्यांच्या लोंढ्यांमध्ये नांदेडचे हेमंत पाटील हेही होते. तरुण आणि हिंदूत्वाच्या विचारांनी भारावलेल्या हेमंत पाटील यांच्यावर शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली.

हे पद घेऊन हेमंत पाटील यांनी जो काही शिवसेनेच्या प्रचार आणि प्रसाराचा धडाका लावला की पुढे त्यांना राजकारणात जिल्हाप्रमुख, नगरसेवक, आमदार आणि आता खासदार अशी पदे मिळत गेली. राजकारणात जम बसल्यानंतर पाटील यांनी सहकार क्षेत्रातही दमदार वाटचाल सुरू केली. त्यांचा हा प्रवासही मोठा रंजक म्हणावा लागेल.

एक साधी रसंवती सुरू केलेले हेमंत पाटील आता साखर कारखान्याचे मालक झाले आहेत. गोदावरी अर्बन मल्टिस्टेट पतसंस्थेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात जम बसवत त्यांनी जिल्ह्यात मोठी आर्थिक ताकदही उभी केली आहे. नांदेड शहरात आषाढी महोत्सवाचे आयोजन करून राज्यातील नामवंत कलाकारांच्या उपस्थितीने नांदेडकरांना सांगीतिक महोत्सवाची मेजवानी देत जनतेशी आपली नाळ तुटणार नाही, याची काळजीही घेतली आहे.

सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून सतत चर्चेत राहणारा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. जनसंपर्क आणि शिवसैनिक असल्याच्या बळावर त्यांनी गेल्या निवडणुकीत फारशी तायारी नसतानाही हिंगोली लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. हिंगोलीचा राजकीय इतिहास पाहता येथे एकदा निवडून आलेला खासदार दुसऱ्यांदा लोकसभेत जात नाही. आता ही परंपरा हेमंत पाटील 2024 मध्ये मोडतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी खासदारकीचा राजीनामा देणारे ते पहिले खासदार होते. परंतु संसदेत समाजाचे प्रश्न मांडा, असे सांगत लोकसभा अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा फेटाळला. समाजासाठी त्यांनी घेतलेल्या या भूमिकेचा लाभही त्यांना येणाऱ्या निवडणुकीत होऊ शकतो. हाडाचे शिवसैनिक असलेल्या हेमंत पाटील यांनी दीड वर्षापूर्वी झालेल्या शिवसेनेच्या बंडात सहभाग घेतला. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. ठाकरे ब्रँड नाकारून शिंदेंच्या शिवसेनेला साथ देण्याचा त्यांचा निर्णय योग्य होता की अयोग्य, याचा फैसला येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत हिंगोलीकर करणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाव (Name) :

हेमंत श्रीराम पाटील

जन्मतारीख (Birth Date) :

16 डिसेंबर 1970

शिक्षण (Education) :

विज्ञान शाखेची पदवी

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background) :

हेमंत पाटील यांच्या कुटुंबाला तशी राजकीय पार्श्वभूमी नाही. त्यांचे वडील श्रीराम पाटील हे पाटबंधारे विभागात अभियंता होते. ते सेवानिवृत्त आहेत. त्यांच्या आई कमलबाई गृहिणी आहेत. पत्नी राजश्री पाटील या सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. गोदावरी अर्बन मल्टिस्टेट पतसंस्थेच्या अध्यक्षा म्हणूनही त्या काम पाहतात. हेमलता राजेन्द्र देसले ह्या पाटील यांच्या भगिनी आहेत.

त्यांना एक मुलगा आहे. त्याचे नाव रुद्र असून त्याने एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. हेमंत पाटील यांच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कामांसाठी त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांची खंबीर साथ लाभली आहे. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही लढविली होती. त्यांचा थोडक्यात पराभव झाला होता.

नोकरी किंवा व्यवसाय काय? (Service/Business):

साखर कारखाना, शेती

लोकसभा मतदारसंघ कोणता? (Lok Sabha Constituency) :

हिंगोली

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation)

शिवसेना (शिंदे गट)

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey) :

खासदार हेमंत पाटील यांच्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा निर्माण केला. त्यांनी एक कट्टर शिवसैनिक म्हणून काम सुरू केले. ते पहिल्यांदा शाखाप्रमुख झाले. शाखाप्रमुख असताना नांदेड शहरात शिवसेनेच्या विस्तारासाठी त्यांनी प्रयत्न केला. जिल्हाप्रमुख असताना सर्व तालुक्यांतील गावागावांत त्यांनी शिवसेनेच्या शाखा स्थापन केल्या.

नांदेड शहरात शिवसेनेच्या शाखा स्थापन करून संघटनात्मक पातळीवर काम वाढवण्यासाठी प्रयत्न केले. नांदेड शहर व जिल्ह्यात काँग्रेसचे वर्चस्व असतानाही हेमंत पाटील यांनी शिवसेनेला जनाधार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आंदोलन करून न्याय मिळवून दिल्याने त्यांच्या समर्थकांची संख्याही वाढली. तरुणांना शिवसेनेच्या प्रवाहात आणण्यासाठी शाखा व गावपातळीवर काम करुन मजबूत संघटन पाटील यांनी शिवसैनिकांच्या मदतीने उभे केले.

शिवसेना जिल्ह्यातील राजकारणात एक प्रमुख पक्ष झाला. त्यांना दिवंगत आमदार प्रकाश खेडकर यांचे मोठे सहकार्य व मार्गदर्शन लाभले होते. नांदेड पालिकेच्या निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून निवडून आले. नगरसेवकपदाच्या कार्यकाळात त्यांनी शहरातील विविध प्रश्नांवर पालिका प्रशासनाला धारेवर धरले. तसेच ते स्थायी समितीचे सभापती झाले होते. शिवसेनेत आपल्या कामामुळे महत्त्वाचे स्थान हेमंत पाटील यांनी निर्माण केले.

त्यांनी विधानसभेची पहिली निवडणूक 2009 मध्ये नांदेड दक्षिणमधून लढवली होती. त्यांचा काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी पराभव केला. या पराभवाने खचून न जाता ते पक्षात सक्रिय राहिले. त्यांनी निवडणुकीची तयारी सुरूच ठेवली. जनतेशी संपर्क कायम ठेवत 2014 मध्ये पुन्हा निवडणूक लढवली. मतविभागणीचा फायदा हेमंत पाटील यांना झाला. त्यांनी अपक्ष उमेदवार दिलीप कंदकुर्ते यांचा पराभव केला.

हेमंत पाटील यांनी आपल्या आमदारकीच्या काळात नांदेड शहरातील विविध विकासकामांना चालना दिली. राज्यात युतीचे सरकार असल्याने त्यांनी विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी खेचून आणला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना हिंगोलीतून उमेदवारी दिली. फारशी तयारी नसताना ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले.

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency) :

हेमंत पाटील यांनी शिवसेनेच्या 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या सूत्रानुसार शहरात व जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्यांची खरी ओळख निर्माण झाली ती सामाजिक कामांमुळे. शहरात त्यांनी अनेक वर्षे आषाढी महोत्सवाचे आयोजन केले. या महोत्सवात देशभरातील नामवंत कलाकारांना आमंत्रित करण्यात येत असत. या महोत्सवाची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती.

शहरातील उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी गोदाकाठी गोदावरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा, महिलांचा सत्कार, फळे-भाजीपाला विक्रेत्यांना छत्रीवाटप, विद्यार्थ्यांना मदत आदी माध्यमांतून सामाजिक उपक्रम ते राबवतात. एक शाळा सुरू करून त्यांनी ज्ञानार्जनाच्या कामालाही हातभार लावला आहे.

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election) :

हेमंत पाटील यांनी 2019 मध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. ते‌ मोठ्या मताधिक्याने निवडून विजयी झाले.

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election) :

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर हेमंत पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. या निवडणुकीची त्यांनी फारशी तयारी केली नव्हती. पण देशात नरेंद्र मोदी यांची लाट होती आणि या लाटेत ते निवडून आले. काँग्रेसने माजी खासदार सुभाषराव वानखेडे यांना उमेदवारी दिली होती. वानखेडे हे शिवसेना, भाजप काँग्रेस असा राजकीय प्रवास केलेले उमेदवार असल्यामुळे हेमंत पाटील यांना त्याचा फायदा झाला. या मतदारसंघात शिवसेनेची व्होट बँक असल्याने वानखेडेंच्याविरोधात मतदारांमध्ये असलेला राग हेमंत पाटील यांच्या बाजूने वळला आणि ते निवडून आले. या मतदारसंघात शिवसेनेचे संघटनात्मक काम आहे. हदगाव, किनवट हे नांदेड जिल्ह्यातील दोन मतदारसंघ हिंगोलीत येतात. त्याचाही फायदा हेमंत पाटील यांना झाला.

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency) :

खासदार हेमंत पाटील यांचा जनसंपर्क दांडगा असून, ते सतत लोकांच्या संपर्कात असतात. नांदेड शहरात व लोकसभा मतदारसंघात त्यांचे जनसंपर्क कार्यालय सुरू असून तेथे येणाऱ्या प्रत्येकाचे समाधान, प्रश्नांची सोडवणूक करणारी यंत्रणा त्यांनी उभारली आहे. नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन शक्य ती मदत करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यांच्या कुटुंबातील सदस्य सार्वजनिक कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहतात. सहज भेटणारा खासदार अशी त्यांची ओळख आहे.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles) :

काळाची पावले ओळखून ते सोशल मीडियावर सक्रिय असतात. फेसबुक, एक्स, आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या कामांची माहिती देतात. शासनाने घेतलेल्या निर्णयांची माहिती, महापुरुषांच्या जयंत्या, सण-उत्सवानिमित्त मतदारसंघातील जनतेला शुभेच्छा देणारे संदेश ते पाठवत असतात.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate) :

खासदार हेमंत पाटील वादग्रस्त वक्तव्य करण्याचे टाळतात. पण विविध प्रकारच्या आंदोलनांनी चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचे मृत्यू झाले होते. तेव्हा त्यांनी रुग्णालयाला भेट देऊन अधिष्ठात्यांना स्वच्छतागृहाची साफसफाई करायला लावली होती. हे प्रकरण चांगलेच गाजले होते. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलकांनी राजीनाम्याची मागणी केली तेव्हा त्यांनी तडकाफडकी खासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्षांकडे दिल्याने ते चांगलेच चर्चेत आले होते. हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री व त्यांच्याच पक्षाचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी जिल्हा नियोजन समितीत हेमंत पाटील यांचा निधीवाटपावरून वाद झाला होता. तेव्हा सत्तार यांचा एकेरी उल्लेख करीत, तू ये इकडे तुला दाखवतो, असे म्हणत पाटील यांनी त्यांना आव्हान दिले होते. याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली होती.

राजकीय गुरु कोण? (Political Godfather/Guru) :

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate) :

हिंगोली व नांदेड जिल्ह्यात हळदीचे उत्पन्न जास्त होते. हळदीला देशभरात मान्यता मिळवून देण्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया केंद्राला मंजुरी आणली. पोफाळी (ता. उमरखेड) येथील साखर कारखाना विकत घेऊन ऊसउत्पादक शेतकऱ्यांची अडचण पाटील यांनी दूर केली आहे. गोदावरी अर्बन मल्टिस्टेट पतसंस्थेच्या माध्यमातून सहकाराचे जाळेही पाटील यांनी निर्माण केले आहे. या माध्यमातून गरजूंना कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. जलसिंचन प्रकल्प, रस्ते विकास आदी कामांसाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. पैनगंगा नदीवर बंधाऱ्यांसाठी मंजुरी मिळविण्याचे प्रयत्न त्यांनी केले आहेत.

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate) :

शिवसेनेत असताना त्यांनी विविध पदे भोगली, पण त्यांनी पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडली व शिंदे गटात प्रवेश केला. याचा एक वेगळा संदेश मतदारसंघात गेला असून, याचा फटका त्यांना बसू शकतो. त्यांनी गटबाजी व‌ तडजोडी केल्यामुळे शिवसेना कमकुवत झाली, असा आरोप त्यांच्यावर केला जातो.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते ? (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences) :

हिंगोलीची जागा ही महायुतीच्या जागावाटपात शिवसेना शिंदे गटाला सुटणार, अशी चर्चा आहे. शिवसेना शिंदे गटाकडे पाटील यांच्याशिवाय सक्षम असा उमेदवार नाही. त्यामुळे उमेदवारी त्यांना मिळेल, अशी अपेक्षा आहे. परंतु, ही जागा भाजपने लढवली तर मात्र महायुती असली तरी हेमंत पाटील पडद्यामागून काही हालचाली करण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा ते अपक्ष म्हणून बंडखोरी करण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

(Edited By - Ganesh Thombare)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT