Nanded Political News : नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला, पण चर्चा झाली ती फक्त आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पॅनेलवर मिळवलेल्या दणदणीत विजयाची. (Nanded Political News) लोहा बाजार समितीत चिखलीकरांच्या पॅनेलचा धुव्वा उडवल्यानंतर काढलेल्या विजयी मिरवणुकीत मेहुणे आमदार श्यामसुंदर शिंदे चांगलेच जोशात होते. यातच त्यांनी दंड आणि मांडी थोपटत खासदार चिखलीकर यांना आव्हान दिले.
जिल्ह्याच्या राजकारणात चिखलीकर आणि त्यांचे मेहुणे आमदार शिंदे यांच्यातील राजकीय संघर्षाची कायम चर्चा होत असते. संधी मिळेल तेव्हा हे दोघेही एकमेकांवर कुरघोडी करतात. नाजूक नात्याला या संघर्षाची किनार असल्यामुळे प्रत्येक निवडणुकीत हे दोन्ही नेते एकमेकांसमोर उभे ठाकतात. (BJP) लोहा बाजार समितीची निवडणूक दोघांसाठीही प्रतिष्ठेची होती, पण या प्रतिष्ठेच्या लढाईत मेहुणे शिंदे यांनी (Pratap Patil Chikhlikar) खासदार चिखलीकरांवर मात केली.
शिंदे यांच्यासाठी हा विजय किती मोठा होता हे त्यांनी केलेल्या जल्लोषावरून स्पष्ट होते. बाजार समिती निवडणूक हा ट्रेलर होता, पूर्ण पिक्चर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दिसणार आहे. (Marathwada) चिखलीकर आणि त्यांचे मेहुणे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्यातील राजकीय वैर दिवसेंदिवस वाढत आहे. मुद्द्यांवरची लढाई गुद्यावर येऊन ठेपली आहे.
लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चिखलीकरांच्या पॅनेलचा धुव्वा उडवल्यानंतर आमदार श्यामसुंदर शिंदेची गाडी सुसाट सुटली आहे. दंड आणि मान थोपटून यापुढे चिखलीकरांना एकाही निवडणुकीत विजय मिळू देणार नाही. मीच खरा पहेलवान आहे, असा दावा त्यांनी केला. शिंदे यांच्या बळाला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे पाठबळ लाभल्याची चर्चा जिल्ह्यात आहे.
लोह्यात निघालेल्या विजयी मिरवणुकीत आमदार मोहन हंबर्डे, माजी आमदार अमरनाथ राजूरकर हे अशोक चव्हाणांचे विश्वासू सहभागी झाले होते. यावरून चिखलीकरांच्या पॅनेलचा पराभव करण्यासाठी चव्हाण यांच्याकडूनच रसद पुरवली गेल्याचे स्पष्ट झाले आहे. चिखलीकर-शिंदे यांच्या नाजूक नात्यातील राजकीय भांडण आपल्यासाठी कसे फायद्याचे ठरेल, यासाठी ही व्यूहरचना केली जात असून, चिखलीकरांना श्यामसुंदर शिंदे यांचा उपद्रव भविष्यातही सहन करावा लागणार आहे.
येणाऱ्या काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत चिखलीकरांची कसोटी लागणार आहे. चिखलीकरांनी अशोक चव्हाणांचे मेहुणे माजी खासदार भास्कर पाटील खतगावकर यांना सोबत घेऊन गेल्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाणांचा पराभव केला. तोच कित्ता अशोक चव्हाण आता गिरवत आहेत.
श्यामसुंदर शिंदे यांना सोबत घेऊन खासदार चिखलीकरांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. लोहा बाजार समितीतील विजयी मिरवणूक शिंदे यांनी चिखलीकरांच्या कार्यालयाच्या समोरून नेली. तिथेच त्यांनी दंड आणि मांडी थोपटत भविष्यातील राजकीय संघर्षाची झलक दाखवून दिली. चिखलीकर हे भस्मासुर आहेत, असा आरोपही शिंदे यांनी या वेळी केला.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.