Rahul Gandhi Visit Nanded Sarkarnama
मराठवाडा

Congress Leader Rahul Gandhi News : मी तुमच्या पाठीशी, सांत्वन भेटीत राहुल गांधींकडून चव्हाण कुटुंबाला शब्द

Jagdish Pansare

Nanded Congress News : या संकटकाळात मी तुमच्या पाठीशी आहे, अशा शब्दात धीर देत काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबाला दिलासा दिला. चव्हाण कुटुंबातील सर्व सदस्यांना एकत्र बोलवत राहुल गांधी यांनी त्यांच्याशी संवाद साधत माहिती घेतली. सांत्वन भेट झाल्यानंतर राहुल गांधी यांनी संपुर्ण चव्हाण वाडाही बघितला.

लोकसभेच्या नांदेड (Nanded) मतदारसंघाचे काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाण यांचे नुकतेच दिर्घ आजाराने निधन झाले होते. या दुःखद घटनेनंतर आज राहुल गांधी यांनी नायगांव येथे येऊन दिवंगत वसंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर चव्हाण कुटुंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.

नांदेड लोकसभा मतदारसंघात वसंतराव चव्हाण यांच्या रुपाने काँग्रेस महाविकास आघाडीने मोठा विजय मिळवला होता. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे नांदेडच नाही तर राज्यात काँग्रेस अडचणीत आली होती.

परंतु नांदेड जिल्हा हा काँग्रेसचाच गड असल्याचे वसंतराव चव्हाण यांच्या विजयाने दाखवून दिले होते. काँग्रेसच्या नांदेडमधील विजयाने जिल्ह्यातील राजकीय गणितं बदलली होती. (Rahul Gandhi) विधानसभा निवडणुकीत लोकसभेपेक्षा मोठा विजय मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता. पण अशातच खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले.

निवडणुक काळात चव्हाण यांनी आपल्या आजारपणावर मात करत दणक्यात प्रचार केला होता. नांदेड जिल्ह्यात कुणाची दादागिरी चालू देणार नाही, असा सज्जड दम भरत त्यांनी आपल्यातील धमक दाखवून दिली होती. महायुतीवर नांदेडमध्ये काँग्रेस महाविकास आघाडीने मिळवलेला हा विजय पक्षाच्या उभारीसाठी संजिवनी ठरला होता.

वसंतराव चव्हाण यांचे निधन झाल्यानंतर आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चव्हाण कुटुंबातील प्रत्येक सदस्याची नायगाव येथील त्यांच्या वाड्यात भेट घेतली. मी तुमच्या पाठीशी आहे, अशा शब्दात त्यांनी चव्हाण कुटुंबातील सदस्यांना धीर दिला. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार अमित देशमुख हे ही सांत्वन भेटीच्या वेळी उपस्थित होते.

राहुल गांधी यांनी चव्हाण कुटुंबातील सगळ्या सदस्यांना एकत्रित बसवून प्रत्येकाची विचारपूस केली. त्यानंतर चव्हाण यांचा वाडा फिरून पाहिला. सांत्वनपर भेट असल्याने राहुल गांधी यांनी कुठलेही भाष्य किंवा माध्यमांशी बोलणे टाळले. राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राहुल गांधींना पाहण्यासाठी लोकांनी हेलिपॅडजवळ तसेच चव्हाण यांच्या घराजवळ गर्दी केली होती. सांत्वन भेट घेऊन परततांना त्यांनी उपस्थितांना अभिवादन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT