Dhananjay Munde Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde News: मला दोन मतांची गरज होती, त्यावेळी अजितदादांनी मदत केली अन्‌ मी आमदार झालो; धनंजय मुंडेंनी सांगितला किस्सा

Dhananjay Munde Sabha In Parli: आगामी काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण मंत्रिमंडळ परळीत आणून त्यांचा सत्कार करणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

Beed News : आमदार धनंजय मुंडे हे दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री झाले आहेत. मंत्री झाल्यानंतर ते प्रथमच परळीत आले होते. त्यांचे नगरपासून परळीपर्यंत ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. त्यानंतर परळीत धनंजय यांचा सत्कार करण्यात आला. त्या सत्काराला उत्तर देताना मुंडे यांनी विधान परिषद आमदारकीचा किस्सा सांगितला. ‘त्यावेळी मला दोन मतांची आवश्यकता होती. अजितदादांनी मला मदत केली आणि मी आमदार झालो, अजित पवारांमुळेच मी विधीमंडळात पोचलो, असे त्यांनी नमूद केले. (I went to the legislature because of Ajit Pawar : Dhananjay Munde)

अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीत बंड करत शिवसेना-भाजप सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पवार यांनी उपमुख्यमंत्री, तर इतर आठ आमदारांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा समावेश आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल मुंडे यांचा परळीत भव्य सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की, मायबाप जनतेने सत्काराच्या माध्यमातून नगरपासून परळीपर्यंत जे प्रेम दिले, त्याचे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही. पण, तुमचा विश्वास कधीही तोडणार नाही. मी प्रथम विधान परिषदेचा आमदार झालो. त्या निवडणुकीत जिंकून येण्यासाठी मला दोन मतांची आवश्यकता होती. त्यावेळी अजित पवार माझ्यासाठी धावून आले, त्यांनी मला मदत केली आणि मी प्रथमच आमदार झालो.

विधानसभेच्या पुढील निवडणुकीत परळीच्या जनतेने मला निवडून दिले आहे. आगामी काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण मंत्रिमंडळ परळीत आणून त्यांचा सत्कार करणार आहे. साथ देणाऱ्या, विश्वास टाकणाऱ्या अजित पवार यांचे आभार मानणार आहे, असेही मुंडे यांनी सांगितले.

या वेळी धनंजय यांच्या पत्नी राजर्षी मुंडे, आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार संजय दौंड, माजी आमदार केशव आंधळे, जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, पापा मोदी, कल्याण आखाडे, बाळा बांगर, डॉ. मधुसूदन केंद्रे, प्रताप देशमुख यांच्यासह शहर व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT