MLA Satish Chavan Sarkarnama
मराठवाडा

MLA Satish Chavan News : `तुतारी` हाती घेण्याआधीच सतीश चव्हाण विरोधाचे `नगारे` वाजू लागले

Jagdish Pansare

सुषेन जाधव

NCP (SP) Political News : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांनी आपल्याच सरकारविरोधात काढलेले प्रसिद्धि पत्रक त्यांच्यासाठी `सेल्फ गोल` ठरण्याची शक्यता आहे. दीड-दोन वर्षापासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघातून लढण्याची तयारी चव्हाण यांनी सुरू केली आहे. निवडणुक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन कार्यक्रम जाहीर करताच सतीश चव्हाण यांनी महायुती सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढत प्रसिद्धि पत्रक काढले.

बहुजनांचे प्रश्न सोडवण्यात महायुती सरकार अपयशी ठरल्याचा चव्हाण यांनी आरोप केला. आता या पत्रकावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सतीश चव्हाण यांच्यावर दोन दिवसात कारवाईचे संकेत दिले आहेत. (NCP) पक्षातून हकालपट्टीची कारवाई होताच सतीश चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून `तुतारी` हाती घेऊन गंगापूर-खुलताबाद मधून लढण्याच्या तयारीत आहेत.

पण त्यांची ही खेळी उलटवण्यासाठी जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकारी कामाला लागले असून त्यांनी सतीश चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशाला कडाडून विरोध सुरू केला आहे. चव्हाण यांना पक्षात घेतले, गंगापूरचे तिकीटही दिले तर आम्ही बंडखोरी करू, असा थेट इशाराच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. आमदार चव्हाण यांना जिल्हाभरातून विरोध होत असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांनी `सकाळ`शी बोलताना सांगितले.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी गंगापूरच्या जागेसाठी आजवर कार्यकर्ते म्हणून राबणाऱ्या भुमिपुत्रांना संधी देण्याची भुमिका घेतली आहे. (Sharad Pawar) त्यात आमदार चव्हाण हे स्थानिक नाहीत, त्यांना मतदार संघातील प्रश्‍नांची जाण नाही. त्यामुळे त्यांना पक्षाकडून उमेदवारी दिली जाऊ नये, यावर जिल्ह्यातील पदाधिकारी ठाम असल्याचे तांगडे पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे चौघे, कॉंग्रेसचे किरण पाटील डोणगावकर, सुर्यकांत गरड तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कृष्णा पाटील डोणगावकर आदींनी शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात यांची भेट घेत चव्हाण यांना पक्षात घेण्यास विरोध दर्शविल्याचे बोलले जाते.

विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात येण्याची चाचपणी करण्याआधी स्थानिक वरिष्ठ नेते म्हणून किशोर पाटील, सुधाकर सोनवणे, द्वारकाभाऊ पाथ्रीकर, संजय वाघचौरे, हरिश्‍चंद्र लघाने, रंगनाथ काळे आदिंची आमदार चव्हाण यांची भेट घ्यायला हवी होती.

ती न घेता थेट पक्षश्रेष्ठींकडे जाणे अयोग्य असल्याचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील म्हणाले. तर आजवर पक्षाच्या अडचणीच्या काळातही आम्ही पक्ष संघटन उभे केले आहे. पक्ष भुमिपुत्रांनाच संधी देणार आहे. चव्हाणांना गंगापूर- खुलताबादचे तिकीट दिले तर बंडखोरी करु, तसा महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णयही झालेला आहे, असे डॉ. ज्ञानेश्‍वर नीळ पाटील यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT