Pwd Minister Ashok Chavan
Pwd Minister Ashok Chavan Sarkarnama
मराठवाडा

विकासकामांत गडबड आढळली तर थेट तक्रार करा, आम्ही त्यांचा बंदोबस्त करू

सरकारनामा ब्युरो

नांदेड : मराठवाड्यातील रेल्वे विकासाच्या प्रश्नांबाबत गेल्या काही वर्षात अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. तीच परिस्थीती रेल्वे उड्डाण पुलाच्या कामां संदर्भात देखील पहायला मिळते. भोकर येथील रेल्वे उड्डाण पुलाचे रखडलेले काम हे दक्षिण रेल्वेकडून मराठवाड्यावर होणाऱ्या दुजाभावाचे प्रतिक आहे, अशी टीका राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली.

या कामासाठी रेल्वे प्रशासनाने केलेल्या दिरंगाईमुळे सर्व सामान्य नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. एका बाजुला वाहतुकीची होणारी कोंडी तर दुसऱ्या बाजुला रेल्वे विभागाकडून कामामध्ये केली जाणारी टाळाटाळ न समजण्यापलीकडची असून दक्षिण मध्य रेल्वेची मराठवाड्याच्या विकासाकडे पाहण्याची दृष्टी दुजाभाव करणारी असल्याचेही चव्हाण म्हणाले.

नांदेड जिल्ह्यातील हदगाव-तामसा-भोकर-उमरी रस्त्याच्या रेल्वे उड्डाण पुलावरील वाहतूकीस आज चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी अशोक चव्हाण म्हणाले, मराठवाड्यातील रेल्वे विकासाच्या प्रश्नांबाबत व्यापक भूमिका घेणे गरजेचे असून याबाबत लवकरच रेल्वे मंत्रालय, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी मी चर्चा करणार आहे.

भोकर येथील आज उद्घाटन झालेल्या उड्डाण पुलाला २०१६ मध्ये मंजुरी दिली गेली होती. अनेक वर्षे हे काम प्रलंबित होते. या प्रलंबित असलेल्या कामाला मागील २ वर्षात युद्ध पातळीवर गती देऊन हा पूल वाहतुकीसाठी खुला करतांना मला आत्मिक समाधान होत आहे. ज्या सर्वसामान्य जनतेने संपूर्ण गावाला वळसा घालून इतके वर्षे त्रास सहन केला त्यांची दिलगिरीही मी व्यक्त करतो.

या पुलाच्या भुयारी मार्गाची पुर्तता येत्या ३ महिन्यात करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भोकरच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. लवकरच येथे शंभर खाटांचे रुग्णालय आपण उभारत आहोत. न्यायालयाची स्वतंत्र इमारत तयार करुन जनतेची प्रशासकीय कामे अधिक दर्जेदार व्हावीत यासाठी देखील सुविधा उपलब्ध करून देत आहे. तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर स्वरुप धारण करतो. याची मला कल्पना असून त्याबाबतही आमचे नियोजन सुरू आहे.

सुधा प्रकल्पाची उंची वाढवून अधिक पाणीसाठा उपलब्ध करण्यावर भर दिला आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन उंची वाढविण्यास शासनाची मान्यता मिळाल्याचेही चव्हाण यांनी यावेळी जाहीर केले. राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक बिकट आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे आमाप नुकसान झाले. अशावेळेस महाविकास आघाडी शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले.

शेतकऱ्यांना दर हेक्टरी पूर्वीजी ६ हजार ८०० रुपये आर्थिक मदत मिळायची यात भरघोस वाढ करुन ती आम्ही १० हजार रुपये हेक्टरी पर्यंत वाढविली. यात शेतकऱ्यांचे इतर प्रश्न आमच्या निदर्शनास आले. पिक विमा योजनेच्या नावाखाली एरवी शेतकऱ्यांची जी दिशभूल केली गेली ती होऊ नये यावर प्रशासनाला दक्ष राहण्यास सांगितले आहे.

नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीतून सावरण्यासाठी आपण जवळपास ११०० कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचवू शकलो. यात पिक विमा योजनेचे ५५० कोटी रुपये हे संपूर्ण महसूल यंत्रणा दक्ष ठेवून त्या विमा कंपनीकडून आपल्याला घेता आल्याचे चव्हाण यांनी आवर्जून सांगितले. तथापि पिक विमा योजनेतून मिळणारी भरपाई ही नगण्य असून राज्य शासनाच्या धर्तीवर ती सुद्धा हेक्टरी १० हजार रुपयापर्यंत कशी मिळेल, यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

या रेल्वे उड्डाण पुलाच्या वाहन मार्गाची रुंदी साडेसात मिटर असून एकुण लांबी ८४७ मिटर इतकी आहे. एकुण मान्यता ४० कोटी रुपयाची असून सार्वजनिक बांधकाम विभागाने ३२.१६ कोटी रुपयाचा निधी व तांत्रिक मान्यता प्रदान केली आहे. विकास कामांना मिळणारा निधी हा अनेक आव्हानातून मिळावावा लागतो.

ज्या विकास कामांसाठी आपण हा निधी आणलेला आहे त्या कामांवरच हा निधी कामातील गुणवत्तेसह दिलेल्या कालमर्यादेत कामे पूर्ण करुन घेऊन खर्ची घालणे हे प्रत्येक विभाग प्रमुखांचे कर्तव्य आहे. रस्ते विकासासह इतर कामात जर काही गडबड आढळली तर खुशाल आमच्याकडे तक्रार करा, आम्ही वेळेवर त्याचा बंदोबस्त करु, असेही चव्हाण यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT