AIMIM leader Imtiaz Jaleel addressing party workers in Chhatrapati Sambhajinagar as internal dissent grows after bold ticket decisions backed by Asaduddin Owaisi. Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jaleel : इम्तियाज जलील यांच्या प्रत्येक निर्णयावर ओवैसींची मोहर; आता महापालिकेत MIM फोडणार सत्ताधाऱ्यांना घाम!

Chhatrapati Sambhajinagar News : इम्तियाज जलील यांच्या धाडसी निर्णयांना ओवेसींचा पाठिंबा मिळाल्याने एमआयएममध्ये असंतोष उफाळला. तरीही संभाजीनगर महापालिकेत सत्ताधाऱ्यांना कडवी टक्कर देण्याची तयारी पक्षाने दाखवली आहे.

Jagdish Pansare

Aimim News : बिहार विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा धुराळा उडवून दिल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये परतलेले एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली होती. लोकसभा-विधानसभा निवडणुकीत कोणी पक्षाचे काम केले आणि कोणी गद्दारी? याचा कच्चाचिठ्ठा हाती असल्याने महापालिका निवडणुकीत धक्कादायक निर्णय घेण्याचा निर्धार इम्तियाज जलील यांनी केला होता. 22 विद्यमान नगरसेवकांना नारळ देण्याचे धाडस आणि या निर्णयावर ओवेसींची मोहर उठवत इम्तियाज यांनी पक्षात एकच खळबळ उडवून दिली.

उमेदवारांच्या याद्या जशाजशा जाहीर होत होत्या, तसा इम्तियाज जलील यांच्याविरोधातील रोष वाढत होता. उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवसापर्यंत संयम राखलेल्या इच्छुकांनी अखेर 'बगावत' केलीच. गेली पाच-दहा वर्ष ज्या इम्तियाज जलील यांचा हुकूम 'सर आँखो पर' मानणारे त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी आपल्याच नेत्याचे फोटो पायदळी तुडवले. दलाल, पैसे घेऊन तिकीटे विकली, निष्ठावंतांना डावलले, बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिली असे एक ना अनेक आरोप झाले. पण हा फक्त ट्रेलर होता, खरा पिक्चर तर प्रचारात दिसून आला.

उमेदवारी कापली गेलेले माजी नगरसेवक, नव्याने पक्षात निर्माण झालेले इच्छूक पण त्यांनाही डावलण्यात आल्याने इम्तियाज जलील यांच्याविरोधातील असंतोषाचा भडका उडाला. इम्तियाज जलील यांना धक्काबुक्की, शिव्या एवढ्यावरच न थांबता थेट त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करेपर्यंत प्रकरण पुढे गेले. एमआयएमला या नाराजी, असंतोषाचा फटका बसणार असे चित्र निर्माण झालेले असतानाही पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांचा इम्तियाज जलील यांच्यावरचा विश्वास कायम होता.

इम्तियाज जलील यांनी उमेदवारांची निवड करण्यापासून त्यांचे तिकीट फायनल करण्यापर्यंतचे सगळे निर्णय ओवेसी यांच्या संमतीनेच घेतले होते. त्यामुळे ते त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. पक्षाला नुकसान पोहचू शकतील अशा नाराजांची समजूत काढत त्यांना प्रचारात सहभागी करून घेत ओवेसी यांनी बऱ्यापैकी डॅमेज कंट्रोल केले. इम्तियाज जलील यांचे फोटो पायदळी तुडवणारे जेव्हा प्रचारात गळ्यातगळे घालून सोबत दिसू लागले, त्याचा चांगला मेसेज मतदारांमध्ये गेला. जिथे जिथे इम्तियाज जलील यांना विरोध, धक्काबुक्की, हल्ल्याचा प्रयत्न झाला तो भाग ओवेसींनी पदयात्रा काढत पिंजून काढला.

रोष, सहानुभूतीत बदलला..

महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीपर्यंत ओवेसी-इम्तियाज जोडीने सगळे वातावरण फिरवून टाकले. ओवेसी यांनी इम्तियाज जलील यांना विरोध करणारे, हल्ला करणाऱ्यांना मतदार ईव्हीएममधून उत्तर देतील, असा इशारा दिला होता, प्रत्यक्षात घडलेही तसेच. ज्या नाराजांनी इम्तियाज जलील यांना व्हिलन ठरवले होते, तेच इम्तियाज जलील महापालिकेच्या निकालानंतर हिरो ठरले आहेत. गेल्या महापालिकेत एमआयएमचे 26 नगरसेवक होते, ती संख्या आता 33 वर पोहचली आहे. हा करिष्मा इम्तियाज जलील यांच्या धडाकेबाज निर्णय आणि त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वामुळे घडला.

बावीस विद्यमान नगरसेवकांची उमेदवारी कापण्याचे धाडस आणि नव्या चेहऱ्यांना संधी देत मैदानात उतरवण्याची जोखीम इम्तियाज जलील यांनी घेतली.'हिमंत ए मर्दा, तो मदत ए खुदा' हे त्यांच्या बाबत खरे ठरले. विपरीत परिस्थिती एमआयएमने गेल्या वेळच्या जागा तर राखल्या, पण त्या सात जागांची भरही टाकली. 'इम्तियाज जलील से कुछ सीखो'असे म्हणत ओवेसींनी त्यांना विरोध करणाऱ्यांना फटकारले होते.

ओवेसींचा इम्तियाज जलील यांच्यावर असलेला विश्वास त्यांनी ढळू दिला नाही. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत 33 नगरसेवकांसह आता एमआयएम दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. भाजपने 57 नगरसेवकांसह बहुमताला गवसणी घातली असली तरी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या एमआयएमचे नगरसेवक त्यांना पाच वर्ष घाम फोडणार एवढे मात्र निश्चित.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT