Mp Imtiaz Jaleel Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jaleel : बांधकाम सभापतीने पाच टक्के कमिशन मागितले; मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी..

कमिशनची मागणी फक्त मलाच नाही तर, जिल्ह्यातील अनेक सरपंचांना केली असल्याचा दावा केला. लवकरच आपण हा सगळा घोटाळा बाहेर काढणार. (Mp Imtiaz Jaleel)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्हा परिषदेतील बांधकाम सभापती किशोर बलांडे यांच्या विरोधात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. (Aimim) ५० लाख रुपयांचे काम मंजूर करण्यासाठी बलांडे यांनी पाच टक्के कमिशन मागितल्याचा आरोप इम्तियाज (Mp Imtiaz Jaleel) यांनी केला आहे.

बलांडे यांनी मात्र या आरोपाचे खंडण करत आपल्यावर खासदारांनी केलेले आरोप बिनबुडाचे आणि राजकीय हेतून केले असल्याचे म्हटले आहे. इम्तियाज जलील यांनी या कमिशनखोरीची थेट तक्रार मुख्यमंत्री कार्यालयाकडे ट्विटद्वारे केली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

इम्तियाज जलील यांनी आपल्या मतदारसंघात जिल्हा परिषदेमार्फत विकास निधी देण्यासाठी प्रस्ताव दिला होता. जिल्हा परिषदच्या बांधकाम सभापतीने त्यासाठी आपल्याकडे पाच टक्के कमिशन मागितल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना टॅग करत या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याची मागणी देखील केली.

असे भ्रष्ट व्यवहार कधीच पाहिलेले नाहीत, कृपया हे थांबवा, असे जलील यांनी आपल्या ट्विट मध्ये नमूद केले. यावर प्रसार माध्यमांशी बोलतांना इम्तियाज जलील म्हणाले, रस्त्यासाठी साडेआठ कोटी निधीचे जि.प. कडे प्रस्ताव दिल्यानंतर, पालकमंत्री सुभाष देसाई यांनी निधी वाटप केल्याचे सांगितले. त्यानूसार जिल्हा परिषद बांधकाम सभापती यांच्याकडे ५० लाखांचा निधी दिल्याचेही त्यांनी सांगितले.

कामाचा प्रस्ताव घेऊन माझा माणूस बलांडे यांच्याकडे गेला तेव्हा त्यांनी ५ टक्के कमिशन मागितले. त्यामुळे मी बलांडेंना फोन केला तर त्यांनी मलाही कमिशन मांगतिले. आता ते आरोप नाकारत असले तरी माझ्याकडे या घटनेचे सगळे पुरावे आहेत, मी हा प्रकार थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवत चौकशीची मागणी केली.

तर दुसरीकडे बांधकाम सभापती बलांडे यांनी मात्र आपल्यावरील आरोप फेटाळत ते निराधार असल्याचे म्हटले आहे. डीपीडीसीकडून मिळालेल्या निधीचे नियोजन करण्याचा जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना असतो. खासदारांनी निधी मागितल्याचा कुठलाच प्रस्ताव माझ्यापर्यंत आला नाही. त्यामुळे मी कमिशन मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, बिनबुडाचे आरोप केल्याबद्दल मीच खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे बलांडे यांनी स्पष्ट केले.

यावर इम्तियाज जलील यांनी कमिशनची मागणी फक्त मलाच नाही तर, जिल्ह्यातील अनेक सरपंचांना केली असल्याचा दावा केला. लवकरच आपण हा सगळा घोटाळा बाहेर काढणार असून, हायकोर्टात देखील जाण्याची आपली तयारी असल्याचे इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे नक्कीच या प्रकरणाची चौकशी लावतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT