AIMIM : एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना काही दिवसांपूर्वी एक धमकीचे पत्र प्राप्त झाले आहे. या पत्रामध्ये इम्तियाज जलील यांना जीवे मारण्याची सुपारी अहिल्यानगर येथील एका तरूणाला देण्यात आल्याचा उल्लेख आहे. हे पत्र इम्तियाज यांनी पोलीसांकडे सुपूर्द केले असून याचा तपास केला जात असल्याचे त्यांनी सांगीतले.
धमकीचे पत्र आल्याची माहिती देताना आपल्याला धमकीचे पत्र आले असून या मध्ये अहिल्यानगर येथील एका तरूणाचे नाव आणि पत्ता देखील नमूद करण्यात आले आहे. संबंधित व्यक्तीला आपली सुपारी देण्यात आली असून तुम्हाला कोणत्याही क्षणी जीवे मारले जाईल, असे पत्रात म्हटले आहे.
अशा धमक्या अनेकदा येत असतात, त्याला आपण भीक घालत नाही. सदर धमकीचे पत्र पोलीसांकडे दिले आहे, आता या पत्राची सत्यता आणि ज्या अहिल्यानगरच्या व्यक्तीला मला जीवे मारण्याची सुपारी देण्यात आली आहे, याची चौकशी पोलीसांनी करावी, असे इम्तिया जलील म्हणाले. शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. गावठी कट्टे, बंदूका राजेरोसपणे शहरा आणल्या जात आहेत, भर रस्त्यात मुडदे पडत आहेत, याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली.
महायुती सरकारमधली मंत्री नितेश राणे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबाची कबर आम्हाला इथे नको, असे म्हणत लवकरच हे शहर औरंगजेब कबरमुक्त होणार आहे, असा दावा केला. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित प्रौढ प्रताप पुरंदर या महानाट्याच्या प्रयोगाला नितेश राणे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी औरंगजेब करबरीचा मुद्दा उपस्थित केला. यावरही इम्तियाज जलील यांनी भाष्य करत नितेश राणे यांनी शिवाजी महाराज कोण होते? हे पुस्तक वाचले आहे का? असा टोला त्यांना लगावला. नसेल वाचले तर मी त्यांना पुस्तक पाठवून देईल, एकदा त्यांनी वाचावे.
शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांना तुम्ही कॉपीराईट असल्यासारखे वाटून घेतले आहे. जेवढे ते तुमचे आहेत, तेवढेच आमचे देखील आहे, आम्हीही त्यांचा आदरच करतो. राहिला प्रश्न औरंगजेबची कबर हटवण्याचा तर केंद्रात तुमचे सरकार आहे, मोदी, शहांना भेटा आणि काढायला सांगा.पण तुम्हाला हेच माहित नाही के तेच औरंगजेबच्या कबरेचे संरक्षण करत आहेत. पुरातत्व विभागाच्या अंतर्गत ती वास्तु येत असल्याने कायद्याने तिचे संरक्षण करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. पण आपल्याला हे माहितच नाही, असा टोलाह इम्तियाज जलील यांनी लगावला.
केवळ जातीय राजकारण करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न नितेश राणेसारख्या लोकांकडून केला जातो. टिपू सुलतान जयंतीवरून देखील असाच वादा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. पण ज्या संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या मुळ संविधानाची प्रत आहे, त्यामध्ये टिपू सुलतान यांचा फोटो आहे. तो तुम्ही काढणार का? असा सवालही इम्तियाज जलील यांनी केला.