BJP corporator Jalinder Shendge addressing the media after responding to allegations made by AIMIM leader Imtiaz Jaleel regarding the Ramai Awas housing scheme controversy. Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jaleel : रमाई आवास योजनेतील घोटाळ्यावरुन MIM, भाजपत जुंपली! भाजप नगरसेवकाचा जलील यांना इशारा; म्हणाले, मागासवर्गीयांची मतं...

Ramai Awas Scheme Scam : रमाई आवास योजनेतील घोटाळ्याच्या आरोपांवरून भाजप नगरसेवक जालिंदर शेंडगे यांनी इम्तियाज जलील यांच्यावर पलटवार करत आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले असून लवकरच अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला.

Jagdish Pansare

Aimim-BJP Controversy News : इम्तियाज जलील हे लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. 2019 मध्ये मागासवर्गीयांच्या मतांवर ते चुकून खासदार झाले होते. पण आता सलग दोन पराभवानंतर ते राजकारणातून संपले आहेत. 2024 मध्ये झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आम्ही इम्तियाज यांना दलित समाजाचे एकही मत मिळू दिले नाही, याचा राग ते आमच्यावर खोटे आरोप करून काढत आहे, असा आरोप भाजपाचे नगरसेवक जालिंदर शेंडगे यांनी केला.

राजकारणातून हद्दपार झालेले इम्तियाज जलील हे चर्चेत राहण्यासाठी असे आरोप सातत्याने करत असतात. त्यांनी आता केलेले आरोप सिद्ध करावेत, अन्यथा राजकारण सोडावे. एकही आरोप जर सिद्ध झाला तर मी राजकारण सोडायला तयार आहे, असे थेट आव्हानही शेंडगे यांनी इम्तियाज जलील यांना दिले आहे. आपण वकीलांशी चर्चा केली आहे, लवकरच आपण त्यांच्यावर अब्रुनूकसानीचा दावा ठोकणार आहोत, असेही शेंडगे यांनी स्पष्ट केले.

इम्तियाज जलील यांनी गुरूवारी 'रमाई अवास' योजनेत मंत्री अतुल सावे यांच्या आदेशावरून मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला. हे आरोप करताना त्यांनी भाजपासह काही पक्षाच्या नगरसेवकांची नावे घेऊन त्यांनी घोटाळा केलेल्या फाइलींची संख्याच सांगीतली. यात नगरसेवक जालिंदर शेंडगे, महेंद्र सोनवणे यांची नावे घेत त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते.

यावर जालिंदर शेंडगे यांनी स्पष्टीकरण देताना एका फाईलचा आरोप जरी खरा ठरला तर राजकारणातून संन्यास घेईन. मुळात इम्तियाज जलील यांना मागासवर्गीय समाजाची मतं मिळाली नाहीत हा खरा राग आहे. विधानसभा, लोकसभा या दोन्ही निवडणुकीत आम्ही पूर्व मतदारसंघातून त्यांना एकही मत मिळू दिले नाही. महेंद्र सोनवणे आणि मी सोबत काम केले, त्यामुळेच इम्तियाज जलील यांनी आमची नावे घेत खोटे आरोप केले आहेत.

घरकुल योजनेचा एक रूपयाही लाभार्थ्यांना सरकारकडून मिळालेला नाही. ज्यांना पैसे मिळाले त्यांनी घरकुल बांधले आहेत, मग घोटाळ्याचा प्रश्न येतोच कुठे? असा सवाल शेंडगे यांनी केला. इम्तियाज जलील हे प्रसिद्धीला हपापले आहेत, त्यामुळे ते खोटे, बिनबुडाचे आरोप करत आहेत. मी लवकरच त्यांच्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहे, याचा पुनरुच्चार शेंडगे यांनी केला.

पोलीस आयुक्तांकडे तक्रार

इम्तियाज जलील यांनी माजी नगरसेविका भारती सोनवणे यांचे पती महेंद्र सोनवणे यांच्यावरही आरोप केले. यावर खोटे पुरावे, बनावट कागदपत्रे तयार करून इम्तियाज हेच आमची बदनामी करत आहेत. त्यांनीच हे सगळे कुंभाड रचले आहे. त्यामुळे खोटी कागदपत्र तयार करून आमच्यावर आरोप करणाऱ्या इम्तियाज जलील यांचीच चौकशी करा, अशी मागणी सोनवणे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. इम्तियाज जलील यांनीच एका व्यक्तीला हाताशी धरून100 कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोपही सोनवणे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT