

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत एमआयएमने 33 नगसेवक निवडून आणत सत्ताधाऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे केले. बहुमताच्या जोरावर सभागृहात हुकूमत गाजवू पाहणाऱ्या भाजपा-शिवसेनेला एमआयएमचे नगरसेवक तगडी फाईट देणार हे स्पष्ट होते. पण एका चुकीने सभागृह गाजवण्याआधीच एमआयएमची कोंडी झाल्याचे चित्र आहे. शहरातील अतिक्रमण हटाव पथकाला विरोध करत केलेली चमकोगिरी आता त्या 11 नगरसेवकांच्या गळ्याशी आली आहे.
महापालिका प्रशासनाने एमआयएमच्या अकरा नगरसेवक व त्यांच्या चार नातेवाईकांविरुद्ध पोलीसांत तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलीसांनी गुन्हे दाखल केले आणि आता महापालिका आयुक्त या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी सरसावले आहेत. स्थायी समिती व विविध विषय समित्यांवरील सदस्य नेमणुकीसाठी आज गुरूवारी (ता. 5) महापालिकेची विशेष सभा पार पडली. यानंतर महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी एमआयएमच्या अकरा नगरसेवकांविरोधात अपात्रतेची कारवाई सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगीतले. रस्त्यावरील अतिक्रमणाच्या आड कोणाही येऊ शकत नाही. नव्याने निवडून आलेल्या सन्मानीय नगरसेवकांना याची चांगली माहिती आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करताना दिलेल्या शपथ पत्रात नगरसेवकांनी अतिक्रमण हटाव विरोधी कायद्याबाबत आपल्याला माहिती असल्याचे मान्य केलेले असते. महानगर पालिका अधिनियम 10 ड (1) नूसार अतिक्रमण हटाव मोहिमेत हस्तक्षेप किंवा ते रोखण्यासाठी नगरसेवक पुढे सरसावत असतील तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाते.
एमआयएमच्या त्या अकरा नगरसेवकांनी नेमके याच कायद्याचे उल्लंघन केल्याचे शहागंज येथील अतिक्रमण हटाव कारवाईच्या दरम्यान दिसून आले आहे. अतिक्रमण हटाव पथकाचे उपायुक्त यांच्या तक्रारीवरूनच पोलीसांनी या नगरसेवकांविरुद्ध गुन्हे नोंद केले आहेत. विरोधी पक्षनेते समीर साजेद बिल्डर व एमआयएमच्या नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी माझी भेट घेतली होती. आमच्या नगरसेवकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे चुकीचे आहेत, सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांच्या सांगण्यावरून विशिष्ट लोकांच्या अतिक्रमणावरच कारवाई करण्यात आल्याचा त्यांचा दावा होता.
परंतु कुठल्याही अतिक्रमणाची माहिती त्या वार्ड, प्रभागातील नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाला देणे अपेक्षितच असते. काही नगरसेवक प्रत्यक्ष येऊन अतिक्रमण दाखवतात, तर काहीजण समोर न येता माहिती देऊन ते हटवण्याची मागणी करतात, असे आयुक्त जी. श्रीकांत यांनी स्पष्ट केले. जे नगरसेवक अतिक्रमणाची माहिती देऊन कारवाईची मागणी करतील तिथे प्रशासन निश्चित कारवाई करणार, असे सांगत आयुक्तांनी एमआयएमचा दावा फेटाळला.
एकूणच एमआयएमच्या नगरसेवकांची सत्ताधारी आणि प्रशासनाने पुरती कोंडी केली आहे. विशेष म्हणजे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी अद्याप या मुद्यावर आपली भूमिका मांडलेली नाही. इम्तियाज जलील यांनी महापालिका निवडणुकीत गेल्या वेळच्या तब्बल 22 विद्यमान नगरसेवकांची तिकीटे कापत नव्या व तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. हे धाडस आता त्यांच्या अंगलट येते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
उत्साहाच्या भरात शहागंज येथील अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध करत फळ विक्रेत्यांना रस्त्यावर पुन्हा गाड्या लावण्यास सांगणारे नगरसेवक आता अडचणीत आले आहेत. तरूण नगरसेवकांमध्ये जोश असला तरी अनुभवाचा अभाव असल्यामुळे पक्ष मोठ्या संकटात सापडला आहे. आता या संकटातून इम्तियाज जलील या नगरसेवकांना कसे वाचवणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.