AIMIM News: संपूर्ण शहरात फ्लाय ओव्हर उभारण्याचा प्रस्ताव मंजूर असताना नव्याने मंत्री झालेले डॉ.भागवत कराड यांनी शहरात मेट्रो लाईन प्रकल्प आणणार असल्याची घोषणा केली. यात डीपीआर तयार करण्यासाठी साडेसात कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने या प्रकल्पाला मान्यता दिली नाही. यामुळे आता या उत्साही मंत्र्यांमुळे शहराचे सात कोटी पाण्यात गेल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्यावर केला.
मेट्रो लाईन संदर्भात पत्रकार परिषदेत इम्तियाज (Imtiaz Jaleel) यांनी सविस्तर माहित देत काही आरोप केले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी चिकलठाणा ते नगर नाक्यापर्यंत फ्लायओव्हरचा प्रस्ताव तयार करण्यासाठी मंजुरी दिली होती. या प्रस्ताव संदर्भात सर्व प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली होती. मात्र डॉ.भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी शहरात मेट्रो लाईन प्रकल्प आणणार असल्याची घोषणा केली.
त्यासाठी महापालिकेच्या वतीने डीपीआर तयार करण्याचे काम देखील हाती घेण्यात आले. (Aimim) मात्र मेट्रो लाईन प्रकल्पाचा डीपीआर तयार होत असताना इम्तियाज यांनी फेब्रुवारी २०२२ ला डीपीआर कामाला स्थगिती देऊन नागरिकांची प्राथमिकता असलेल्या विकास कामांना प्राधान्य द्यावे, असे पत्र स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला दिले होते. मात्र मेट्रो लाईन प्रकल्पाला मी केंद्राकडून निधी मिळून देईल, असा दावा डॉ.कराड यांनी केला होता.
यावर महापालिकेने ३ हजार ७३७ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला पाठवला होता. यावर प्राधिकरणाने हा प्रस्ताव नाकारत परत पाठवला आहे. यामुळे मेट्रोच्या डीपीआरवर खर्च करण्यात आलेले जनतेचे साडेसात कोटी रुपये बुडाले असून भागवत कराड व तत्कालीन मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी हे पैसे परत करावे.
अन्यथा मी या संदर्भात सेंट्रल अर्बन डेव्हलपमेंट कमिटीकडे तक्रार करणार, असा इशारा इम्तियाज जलील यांनी यावेळी दिला. तसेच संसदेमध्ये हा प्रश्न उपस्थित करणार असल्याचेही सांगितले. आता मेट्रोचा प्रकल्प नाकारण्यात आल्यानंतर या प्रकल्पाच्या डीपीआरसाठी खर्च केलेले साडेसात कोटी कराड यांनी आपल्या खिशातून भरावे. किंवा पावणेचार हजार कोटीच्या मेट्रो प्रकल्पाला मंजुरी आणि निधी आणावा, असे त्यांना माझे आव्हान आहे. स्मार्ट सिटीतून घेतलेले साडेसात कोटी रुपये कराड, पांडेय यांनी जमा करावे, असेही इम्तियाज जलील म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.