Mp Imtiaz Jalil, Aurangabad
Mp Imtiaz Jalil, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jalil : रेल्वे मंत्री खरंच सांगा, पीटलाईन जालन्यात होणार की औरंगाबादेत?

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : मराठवाडा रेल्वे विकासाच्या दृष्टीने तसेत देशभरात पसरलेल्या रेल्वे जाळ्याशी जोडण्यासाठी महत्वाची ठरणारी पीटलाईन सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. मराठवाड्याची आणि राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबादेत (Aurangabad) रेल्वे दुरुस्ती व देखभालीसाठीची पीटलाईन व्हावी, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षापासून केली जात आहे.

परंतु दक्षिण रेल्वेशी जोडल्या गेलेल्या मराठवाड्यावर या विभागातील अधिकाऱ्यांकडून या मागणीला कायमच वाटाण्याच्या अक्षदा दाखवल्या गेल्या. आता कधी नव्हे ते मराठवाड्याला थेट रेल्वे मंत्रालयाचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री म्हणून रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्याकडून आली आहे. परंतु राज्यमंत्री म्हणून त्यांनी फक्त आपल्या मतदारसंघाचाच विचार केल्याचे त्यांच्या कृतीतून दिसून येत आहे.

नेमंक यावर बोट ठेवत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी आज लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. रेल्वे मंत्रालयाकडून पीटलाईन औरंगाबादेत होणार असे सांगितले जाते, तर दुसरकीडे याच मंत्रालयाचे राज्यमंत्री दानवे हे मात्र पीटलाईन ही जालन्यात म्हणजेच आपल्या लोकसभा मतदारसंघातच होणार असे छातीठोकपणे सांगत आहेत.

त्यामुळे जनतेच्या मनात कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी नेमका हाच मुद्दा उपस्थित करत लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. रेल्वे मंत्री खरंच सांगा, पीटलाईन जालन्यात होणार की औरंगाबादेत? अस म्हणत त्यांनी रेल्वे मंत्रालयाकडे विचारणा केली. मराठवाड्यातील केंद्रातील दुसरे मंत्री डाॅ. भागवत कराड यांनी देखील रेल्वे पीटलाईन औरंगाबादेतच होणार असल्याचे अनेकदा जाहीर कार्यक्रमांमधून सांगितले.

त्यामुळे भाजपचे हे दोन्ही मंत्री पीटलाईन आपल्याच जिल्ह्यात होणार असा दावा करत आहेत, मग सत्य काय? हे मात्र अजूनही समजू शकलेले नाही. इम्तियाज जलील यांनी आज लोकसभेत औरंगाबाद शहरातील रेल्वे संदर्भातील दोन प्रमुख मागण्यांवर प्रकाश टाकला. पहिला प्रश्न त्यांनी पीटलाईनच्या संदर्भात उपस्थीत केला. तर दुसरा शिवाजीनगर भागातील रेल्वे भुयारी मार्ग कधी करणार हे स्पष्ट करावे, अशी मागणी देखील त्यांनी केली.

इम्तियाज जलील म्हणाले, शिवाजीनगर रेल्वे भुयारी मार्गाला मंजुरी मिळालेली आहे. राज्य सरकारने या भुयारी मार्गासाठी द्यावा लागणारा ५० टक्के हिस्सा देखील दिला आहे. परंतु त्यांनतरही या भुयारी मार्गाचे काम सुरू झालेले नाही. याचा फटका या भागात राहणाऱ्या पाच लाखाहून अधिक नागरिकांना बसतो आहे.

उच्च न्यायालयाने देखील याची गंभीर दखल घेत रेल्वे विभागाला शिवाजीनगर भुयारी मार्गाचे काम तातडीने करण्याचे निर्देश दिले होते. मी स्वतः यापुर्वीच्या दोन-तीन अधिवेशनात हा मुद्दा उपस्थितीत केला होता. आता तरी माझ्या प्रश्नांची उत्तरे मला मिळतील का? असा सवाल इम्तियाज जलील यांनी सभागृहात केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT