Khaire, Bhumre or Imtiaz Jalil
Khaire, Bhumre or Imtiaz Jalil Sarakarnama
मराठवाडा

Chhatrapati sambhaji nagar Constituency: छत्रपती संभाजीनगरात तिरंगी लढत ; महायुती- आघाडी- एमआयएम भिडणार!

Jagdish Pansare

Loksabha Election 2024 : महायुतीचा लोकसभा निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाचा उमेदवार कोण? याचा निर्णय अखेर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या नावाची घोषणा केली आहे.

त्यामुळे आता संभाजीनगरमध्ये महायुती-महाविकास आघाडी आणि एमआयएम या तीन पक्षात तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण, वंचित बहुजन आघाडीने अफसर खान यांना उमेदवारी दिली असली तरी ते किती प्रभावी ठरतील याबाबत साशंकता आहे. 

गेल्या लोकसभा निवडणुकीत हिंदू मतांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या विभाजनाचा लाभ एमआयएम-वंचित बहुजन आघाडीच्या इम्तियाज जलील यांना झाला होता. या निवडणुकीत मात्र एमआयएम-वंचित स्वबळावर लढत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना-राष्ट्रवादीत फुट पडल्याने याचा परिणाम देखील मतदानावर होणार आहे. तीनही पक्षांच्या उमेदवारांवर नजर टाकली तर चंद्रकांत खैरे हे यापूर्वी सलग चार वेळा लोकसभेवर निवडून गेल्यामुळे त्यांना मोठा अनुभव आहे. 

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीचे संदीपान भुमरे(Sandipan Bhumre) पैठण विधानसभा मतदारसंघातून पाचवेळा निवडून आले आहेत, तर सध्या ते राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. एमआयएमचे इम्तियाज जलील यांचा गेल्या निवडणुकीत अनपेक्षित विजय झाला असला, तरी गेल्या पाच वर्षात त्यांनी खासदार म्हणून आपल्या कामाची छाप पाडली आहे. 2014 मध्ये मध्य विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले होते. या तीनही उमेदवारांचा राजकीय आलेख पाहता संभाजीनगरची लढत तुल्यबळ होणार एवढे मात्र निश्चित.

खैरेंना ठाकरे गटाच्या सहानुभूतीची आशा..-

गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला, अडीच वर्षापुर्वी पक्ष फुटला परंतु या संकटाच्या काळात खैरे पक्षाशी एकनिष्ठ राहिले. त्यांच्या या निष्ठेचे फळ उद्धव ठाकरे यांनी त्यांना सहाव्यांदा लोकसभेची उमेदवारी देत दिले. दोन वेळा आमदार, चार वेळा खासदार राज्यात युतीची सत्ता असतांना विविध खात्याचे मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून खैरे यांनी काम केले आहे. त्यांना राज्याच्या आणि दिल्लीतील राजकारणाचा दांडगा अनुभव आहे. 

लोकसभेला गेल्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही त्यांनी जनसंपर्क कायम ठेवला, हे त्यांच्यासाठी बलस्थान ठरू शकते. खैरे यांचा गेल्या निवडणुकीत निसटता म्हणजे अवघ्या साडेचार हजार मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे त्यांच्याबद्दल मतदारांमध्ये सहानुभूतीची भावना दिसते. शिवाय आपली ही शेवटची निवडणूक आहे, 2029 ची लोकसभा निवडणूक आपण लढवणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी मतदारांना भावनिक साद घालयाला सुरुवात केली आहे. याचा त्यांना कितपत फायदा होतो हे मतदानानंतर स्पष्ट होईल. 

चार टर्म खासदार राहिल्यामुळे खैरे(Chandrakant Khaire) यांची मतदारसंघात निश्चित अशी वोट बॅंक तयार झाली आहे. यावेळी भाजप सोबत नसल्याचा काहीसा परिणाम त्यांना जाणवणार आहे. मात्र महाविकास आघाडी असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी या घटक पक्षांकडून ही तूट भरून निघू शकते. खैरे यांनी वीस वर्ष काय केले? हा विरोधकांचा आरोप त्यांच्यावर कायम असला तरी सहानुभूतीच्या लाटेवर खैरे स्वार होऊ शकतात, असे बोलले जाते.

भुमरेंची मदार भाजपच्या यंत्रणेवर.. -

संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची जागा मिळवण्यासाठी शिंदे गटाला बरीच शक्ती पणाला लावावी लागली. त्यामुळे महाविकास आघाडी, एमआयएम प्रचारात पुढे निघून गेल्यानंतर अगदी प्रचाराला वीस दिवस शिल्लक असतांना संदीपान भुमरे यांची उमेदवारी आज मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. राज्यात मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आणि त्याचा फायदा निवडणुकीत मतांच्या रुपात करून घेण्यासाठी शिंदे यांनी आवर्जून भुमरे यांच्या रुपात मराठा उमेदवार दिला. 

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT