Maharashtra Assembly Election 2024 : एकदा अपक्ष आणि दोन वेळा भाजपच्या तिकीटावर आमदार झालेले गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रशांत बंब यांच्यावर पक्षाने पुन्हा विश्वास दाखवला आहे. 2009 मध्ये पहिल्यांदा या मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत बंब यांनी विजय मिळवला होता. 1962 पासून काँग्रेस आणि त्यानंतर काही काळ शिवसेनेचे वर्चस्व असलेला गंगापूर-खुलताबाद मतदारसंघ आता भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. तो करण्यात विद्यमान आमदार प्रशांत बंब यांची भूमिका महत्वाची ठरली.
वादग्रस्त तितकाच चर्चेत राहणारा आक्रमक चेहरा म्हणून बंब (Prashant Bamb) यांची राज्याला ओळख आहे. 2024 ची विधानसभा निवडणुक अनेक राजकीय घडामोडी, आरक्षणाच्या मुद्यावरून सत्ताधारी महायुती विशेषतः भाजप विरोधात असलेले वातावरण पाहता बंब यांच्यासाठी कसोटी पाहणारी ठरणार आहे. सलग तीन वेळा विजय मिळवल्यामुळे बंब यांच्यात आत्मविश्वास असला तरी विरोधकांनी त्यांच्याविरोधात डाव टाकला आहे. आता हा डाव बंब विरोधकांवर उलटवतात? की मग त्याचे बळी ठरतात, हे 23 नोव्हेंबरच्या निकालानंतर कळेल.
महाविकास आघाडीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ऐकमेव गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांनी गंगापूर-खुलताबाद मतदारसंघात दोन वर्षापासून केलेली तयारी, निवडणूक जाहीर होताच त्यांनी महायुतीच्या विरोधात घेतलेली भूमिका आणि पक्षातून त्यांची तडकाफडकी झालेली हकालपट्टी हा काही केवळ योगायोग नाही.
विरोधकांच्या रणनितीचा हा एक भाग आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सतीश चव्हाण हे अजित पवारांसोबत गेले होते. त्याआधी 2019 मध्ये अजित पवारांनी घेतलेली भूमिका आणि पहाटेचा शपथविधीच्या वेळीही चव्हाण अजित पवारांसोबतच होते. (BJP) आता विधानसभेच्या गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातील उमेदवारीसाठी त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रयत्न सुरू केले आहेत. ते यशस्वी झाले तर गंगापूर-खुलताबादची लढत ही जातीय समीकरणावर लढली जाईल, एवढे मात्र निश्चित.
महाविकास आघाडी आणि महायुतीतील शिवसेना- राष्ट्रवादी या घटक पक्षाच्या उमेदवारांची नावे अद्याप गुलदस्त्यात आहेत. भाजपने मात्र विद्यमान आमदार प्रशांत बंब यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देत मैदानात उतरवले आहे. मतदारसंघात चौफेर विकासकामे केल्याचा दावा, विरोधकांकडून बोहरचा उमेदवार लादला जाणार या भोवती भाजप-महायुतीचा प्रचार असणार आहे. तर महाविकास आघाडीकडून बंब यांना खिंडीत गाठण्यासाठी अनेक मुद्यांची जंत्री तयार ठेवण्यात आली आहे.
या मतदारसंघाने दोन वेळा अपक्ष उमेदवारांना निवडून पाठवले आहे. 1995 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अशोक पाटील डोणगांवकर हे अपक्ष निवडून आले होते. तर 2009 मध्ये प्रशांत बंब यांनी पहिल्यांदा अपक्ष निवडणुक लढवत विजय मिळवला होता. तर त्याआधी 1990-99-2004 मध्ये शिवसेनेच्या अनुक्रमे कैलास पाटील, अण्णासाहेब माने पाटील यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता.
बंब यांची तालुक्यातील राजकारणात एन्ट्री झाली आणि शिवसेनेकडे असलेली ही जागा भाजपने खेचून नेली. या मतदारसंघात साखर कारखान्याचे राजकारण गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्या आरोप-प्रत्यारोप होऊन प्रकरण न्यायालयापर्यंत पोहचले होते. आता हा कारखाना शिवसेनेच्या ताब्यात असून खाजगी व्यक्तीला तो भाडेतत्वावर चालवण्यासाठी देण्यात आला आहे. एकूणच गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील यावेळची लढत रंगतदार आणि तितकीच अटीतटीची होऊ शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.