Vasant Chavan  Sarkarnama
मराठवाडा

Nanded Loksabha Constituency News : नांदेड पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस चव्हाण कुटुंबातीलच उमेदवार देणार

Jagdish Pansare

Nanded Congress Political News : लोकसभेच्या नांदेड मतदार संघात काँग्रेस महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. मात्र नुकतेच त्यांचे आजारपणामुळे निधन झाले. अवघ्या दोन महिन्यात वसंत चव्हाण यांची प्राणज्योत मालवल्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याची वेळ आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसोबत नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभुमीवर दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होत पुन्हा एकदा काँग्रेस (Congress) नांदेड मध्ये विजय मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकतीच नायगाव येथे येऊन चव्हाण कुटुंबीयांची सांत्वन भेट घेतली होती. यावेळी त्यांनी चव्हाण कुटुंबाला मी तुमच्या पाठीशी आहे, असा शब्द दिला होता.

त्यानंतर दोन दिवसातच वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण यांना नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली जावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस समितीच्या बैठकीत करण्यात आली. या संदर्भात ठराव घेत स्थानिक कॉंग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यांनी रवींद्र चव्हाण यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवत या संदर्भातला प्रस्ताव राज्याच्या आणि केंद्राच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवण्याची तयारी सुरू केली आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर नांदेड लोकसभेत दिवंगत वसंतराव चव्हाण यांच्या रूपाने मिळालेला विजय काँग्रेससाठी ऐतिहासिक ठरला होता. (Nanded) काँग्रेस म्हणजे अशोक चव्हाण आणि अशोक चव्हाण म्हणजेच काँग्रेस, असे काहीसे समीकरण गेल्या अनेक वर्षापासून होते. आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री अशी सर्व पदे उपभोगलेल्या चव्हाण यांची नांदेड जिल्ह्यावर मजबूत पकड होती. त्यांच्या भाजप प्रवेशानंतर जिल्हा काँग्रेस मुक्त होईल, असा भाजप नेत्यांचा अंदाज होता.

मात्र लोकसभा निवडणुकीतील पराभवाने या नेत्यांचा अंदाज फोल ठरवला. लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधीच अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. अशावेळी महायुतीच्या प्रताप पाटील चिखलीकर यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी द्यावी ? असा प्रश्न काँग्रेस श्रेष्ठींसमोर होता. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एकमेव नाव सुचवले आणि ते नाव होते वसंतराव चव्हाण यांचे. वसंतराव चव्हाण यांच्यावर काँग्रेस पक्षाने टाकलेला विश्वास त्यांनी निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत सार्थ ठरवला.

अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडल्याचा राग काँग्रेस मधील एकनिष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पक्षाच्या पारंपारिक मतदारांनी मतपेटीतून व्यक्त केला. परंतु अवघ्या दोन महिन्यात वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले. त्यांना खासदार म्हणून काम करण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळे पोटनिवडणुकीत त्यांच्या कुटुंबातील सदस्यालाच उमेदवारी दिली जावी, असा मतप्रवाह होता.

त्यानूसार वसंतराव यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण यांना लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली आहे. चव्हाण कुटुंबीयांबद्दल सहानुभूती असल्यामुळे रवींद्र चव्हाण यांच्या उमेदवारीला विरोध होणार नाही, शिवाय राहुल गांधी यांचीही त्यांच्या नावाला संमती मिळेल, अशी अपेक्षा नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते बाळगून आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT