Beed NCP Meeting  Sarkarnama
मराठवाडा

Beed Politics : कृषिमंत्री मुंडेंच्या पदरात अग्रीमचे 'क्रेडिट' तर नाहीच,पण नाराजीच अधिक...

Dhananjay Munde News : आमदार संदीप क्षीरसागर यांनी शेतकऱ्यांवर खोडसाळपणाने अन्याय करू नये असे म्हटले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Beed : राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असलेल्या बीड जिल्हयात यंदा वरुणराजाने चांगलेच डोळे वटारले आहेत. त्यामुळे खरीपातील सोयाबीन, मुग, उडीद, तुर, बाजरी आदी पिके करपून जात आहेत. आता पीक विमा अग्रीम मंजूर झाला असला तरी अनेक महसूल मंडळे वगळल्याने शेतकरी नाराज आहेत.

या पिक विमा अग्रीम मंजुरीचे क्रेडिट घेण्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची यंत्रणा सरसावली खरी पण त्यांच्या पक्षातील नेत्यांसह भाजप, शिवसेनेच्या नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या पिक विमा अग्रीमबाबतच्या अधिसुचनेच्या दुसऱ्याच दिवशी निवेदने दिले.

कृषिमंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनी चार दिवसांपूर्वी संभाजीनगर येथे मराठवाड्यातील दुष्काळ सदस्य परिस्थितीच्या आढाव्यामध्ये मराठवाड्यातील जिल्ह्यांना दिलेल्या आदेशाचे बीड जिल्हा प्रशासनाने तंतोतंत पालन केले असून, बीड जिल्ह्यातील सर्व 87 महसुली मंडळांमध्ये अग्रीम पीकविमा देण्याचे मान्य करत संबंधित पीकविमा कंपनीस अग्रीम तातडीने वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत, असे पत्रकाद्वारे माध्यमांना कळविले.

मात्र, जिल्ह्यात पावसाने महिनाभरापासून उघडीप दिल्याने सरसकट सर्वच पिकांना विमा अग्रीम द्यावा अशी मागणी होती. मात्र, सोयाबीनसाठी ५२ मंडळे, मुगासाठी 22 मंडळे तर उडीद पिकासाठी १३ महसूल मंडळांसाठी विमा अग्रीम मंजूर झाला आहे. मंत्र्यांच्या यंत्रणेने तीन्ही पिकांच्या मंडळांची गोळाबेरीज करुन ८७ मंडळांचा फुगलेला आकडा समोर आणला असला तरी वेगवेगळ्या मंडळांत वगळलेल्या पिकांवरुन शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षातील नेत्यांसह भाजप, शिवसेनेच्या नेत्यांनी वंचित शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.

राष्ट्रवादीच्या शरद पवार(Sharad Pawar) गटाचे जिल्हाध्यक्ष आमदार संदीप क्षीरसागर(Sandeep Kshirsagar) यांनी शेतकऱ्यांवर खोडसाळपणाने अन्याय करू नये असे म्हटले आहे. तर, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) जिल्हा उपाध्यक्ष बबन गवते यांनीही निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन न्याय द्या, अशी मागणी केली आहे. एकीकडे कृषी मंत्र्यांच्या सुचनेचे तंतोतंत पालन असे सांगितले जात असताना दुसरीकडे पक्ष व मित्रपक्षातील नेतेच शेतकऱ्यांना न्याय द्या अशी मागणी होत आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT