Vilas Ghule Case  Sarkarnama
मराठवाडा

Vilas Ghule: विलास घुले हत्या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडं, पोलीस महासंचालकांचे आदेश

केज तालुक्यातील टाकळी येथील तरूण हाॅटेल चालक विलास घुले खून प्रकरणाचा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आला आहे.

Jagdish Pansare

Beed News : केज तालुक्यातील टाकळी येथील तरूण हाॅटेल चालक विलास घुले खून प्रकरणाचा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आला आहे. विशेष तपास पथकाचे (एसआयटी) प्रमुख तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांनी या घडामोडीला दुजोरा दिला आहे.

​स्थानिक पोलिसांवर राजकीय दबाव असून निष्पक्ष तपास होत नसल्याचा गंभीर आरोप करत मृत विलास घुले यांच्या कुटुंबीयांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची बुधवारी (29 जुलै) सायंकाळी मुंबई येथे भेट घेऊन निवेदन दिले होते. या निवेदनात त्यांनी तपासात सौरभ सोनवणे याला आरोपी न केल्याकडे लक्ष वेधले होते.

तसेच हा खटला सीआयडीकडे सोपवून न्यायालयात खटल्याच्या प्रभावी सुनावणीसाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी, अशी प्रमुख मागणी केली होती. कुटुंबीयांचे म्हणणे आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत राज्याच्या पोलीस महासंचालकांनी तातडीने विलास घुले खून प्रकरणाचा तपास सीआयडीकडे हस्तांतरित करण्याचे स्पष्ट आदेश दिले.

​वरिष्ठांचे हे आदेश प्राप्त होताच, रविवारी 2 ऑगस्ट रोजी विशेष तपास पथकाने आतापर्यंत केलेल्या संपूर्ण तपासाचा सविस्तर अहवाल, सर्व कागदपत्रे आणि उपलब्ध पुरावे अधिकृतपणे सीआयडीच्या पथकाकडे सुपूर्द केले आहेत.

काय आहे प्रकरण?

20 जून 2026 रोजी रात्री केज तालुक्यातील टाकळी येथील गावकरी हॉटेलमध्ये उमेश माने आणि त्याच्या मित्रांना काही लोकांनी मारहाण केली. उमेश माने याचे आरोपींच्या नातेवाईकातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा वाद होता. हॉटेल मालक विलास घुले यांनी भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी केली. आरोपींनी 'मध्ये का पडतो' म्हणत विलास घुले यांना हॉटेलमागे गाठले.

रामेश्वर गायकवाड याने विलास यांच्या पोटात चाकू खूपसला. उपचारादरम्यान विलास घुले यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. बाबासाहेब कदम, मंगेश कदम, रामेश्वर गायकवाड, शुभम गायकवाड, भय्यासाहेब गायकवाड, बंकट कदम, नवनाथ कदम, दीपक कदम, संतोष कदम अशी आरोपीची नावे आहेत.

विलास घुले यांचे भाऊ रमेश घुले यांनी या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांचे चिरंजीव सौरभ सोनवणे यांचे नाव घेतले. आरोपींना पळून जाण्यास मदत आणि गाडी दिल्यामुळे सौरभ सोनवणे याचा या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप केला. एका संशयिताने पुरवणी जबाबात सौरभचे नाव घेतल्यानंतर या प्रकरणाला राजकीय वळण प्राप्त झाले.

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी विधीमंडळात हा मुद्दा लावून धरला. बजरंग सोनवणे यांनी माझा मुलगा किंवा मी दोषी असेल तर कारवाई करा, अशी भूमिका घेत या प्रकरणात राजकारण करून माझ्या मुलाला गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला. दरम्यान, IPS वेंकटराम यांच्या अध्यक्षतेखाली 6 सदस्यीय विशेष तपास पथक या प्रकरणाच्या तपासासाठी नेमण्यात आले. एसआयटीकडून या प्रकरणाची चौकशी सुरू होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT