मराठवाडा

Jalna political news today : महापालिका, जिल्हा परिषदेत पिछाडीवर पडलेली शिवसेना स्थानिक'साठी भाजपशी पंगा घेण्याच्या तयारीत!

Shiv Sena vs BJP local body politics Maharashtra : जालना-छत्रपती संभाजीनगर MLC निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आणि जिल्हा परिषदेत पिछाडीवर असलेली शिवसेना आता स्थानिक राजकारणात भाजपशी थेट संघर्षाच्या तयारीत आहे.

Jagdish Pansare

Shivsena BJP news : मराठवाड्यात भाजपपेक्षा वरचढ राहिलेल्या शिवसेनेची ताकद गेल्या काही वर्षात कमी झाली आहे. नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका या निवडणुकीत मराठवाड्यात भाजपने मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला कधीच मागे टाकले आहे.

विशेषतः छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यांमध्ये भाजप आता मोठ्या भावाच्या भूमिकेत तर शिंदे यांची शिवसेना छोटा भाऊ म्हणून वावरताना दिसते आहे. छत्रपती संभाजीनगर- जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने या दोन पक्षांमध्ये पुन्हा एकदा वर्चस्वाची लढाई होताना दिसते आहे.

युतीमध्ये शिवसेनेकडे असलेला हा मतदारसंघ बदलती राजकीय समीकरणे आणि भाजपची वाढती ताकद पाहता आपल्याला मिळावा यासाठी दोन्ही जिल्ह्यातील भाजपचे नेते तयारीला लागले आहेत. तर दुसरीकडे शतप्रतिशतच्या नावाखाली मित्रपक्षांचीच कोंडी करणाऱ्या भाजपाला शरण जायचे नाही, असे ठरवून शिवसेनेच्या नेत्यांनी कुठल्याही परिस्थितीत स्थानिकची ही जागा सोडायची नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी मतदान होणार आहे. महायुती या सर्व 17 जागा एकत्रित लढणार असले तरी कोणत्या पक्षाला किती जागा? याचे गणित अद्याप सुटलेले नाही. याशिवाय भाजपने शिवसेनेकडे असलेल्या काही जागांवर दावा सांगितल्याने या दोन पक्षांमध्ये संघर्षाचा भडका उडालेला दिसतो.

छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यंदा भाजपने जोरदार मुसंडी मारत एकहाती सत्ता मिळवली आहे. संख्याबळात सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे भाजपने ही जागा आम्हीच लढवणार अशी भूमिका घेत शिवसेनेशी दोन हात करण्याची तयारी दर्शवली आहे. तर जालना आणि छत्रपती संभाजीनगर महापालिकेत शिवसेनेशी युती न करता स्वबळावर लढलेल्या आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत शिवसेनेकडे 21 सदस्य एवढे संख्याबळ असताना त्यांना सत्तेबाहेर ठेवलेल्या भाजपला ही जागा कदापिही सोडणार नाही, अशी आक्रमक भूमिका पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्यासह स्थानिक शिवसेना नेत्यांनी घेतली आहे.

ही जागा भाजपला कदापिही सोडू नका, असा आग्रह उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे धरण्यात आला आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर -जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावरून शिवसेना-भाजपमध्ये मतभेद असल्याचे कबूल केले आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात शिवसेनेची गेल्या काही वर्षात कमालीची पीछेहाट झाली आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ हातून गेला तर शिवसेनेचे मराठवाड्यात मोठे राजकीय नुकसान होणार आहे. भविष्यातील हा धोका लक्षात घेता छत्रपती संभाजीनगर- जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ कुठल्याही परिस्थितीत भाजपला सोडायचा नाही, असा चंग शिवसेनेच्या नेत्यांनी बांधला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT