जालना : औरंगाबाद येथे झालेल्या शिंदे सेनेच्या मेळाव्यात राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी किमान माझ्या मतदार संघात तरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत (Bjp)भाजपला सोबत घेणार नाही, मैत्रीपूर्ण लढत करू अशी इच्छा व्यक्त केली होती. राज्यात शिंदे व भाजप एकत्रित सत्तेत असताना (Abdul Sattar) सत्तारांनी घेतलेली ही वेगळी भूमिका सगळ्यांनाच आश्चर्यकारक वाटली. अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपचे नेते जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल, अशी सावरा सारवासरवही सत्तार यांनी केली होती.
यावर जालन्याचे खासदार तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अब्दुल सत्तार यांनी मैत्रीपूर्ण लढतीची भाषा केली असली तरी भाई भाई म्हणून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करू. पण त्यांनी नाही ऐकले तर मात्र कुस्तीला आम्ही तयार आहोत, असा इशारा दानवे यांनी दिला आहे.
अब्दुल सत्तार यांचा सिल्लोड-सोयगाव हा मतदार संघ दानवे यांच्या लोकसभा मतदारसंघात येतो. गेल्या पंधरा-वीस वर्षापासून जालना लोकसभा आणि सिल्लोड सोयगाव-विधानसभा मतदारसंघात अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांची एकमेकांना कशी छुपी मदत होते हे आता लपून राहिलेले नाही. परंतु गेल्या दोन अडीच वर्षात अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड-सोयगाव मतदार संघावर आपली मजबूत पकड मिळवली आहे.
विधानसभेतील विजयासह मतदार संघातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपालिका या सगळ्याच निवडणुकांमध्ये सत्तार यांनी एक हाती सत्ता मिळवली आहे. शिवाय येणाऱ्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ते आपला मुलगा समीर सत्तार याला मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत. या निवडणुकीआधी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणुकीमध्ये आपली पकड कायम ठेवण्यासाठी भाजपशी युती नको, अशी भूमिका सत्तार यांनी घेतल्याचे बोलले जाते.
त्याला रावसाहेब दानवे यांच्याकडून आव्हान दिले जाऊ शकते. जालन्यात दानवे यांनी यासंदर्भात दिलेली प्रतिक्रिया हेच दर्शवणारी आहे. त्यामुळे रावसाहेब दानवे यांना आपल्याच मतदारसंघातील एका विधानसभा मतदारसंघांमध्ये युती असलेल्या नेत्याशीच दोन हात करावे लागणार की काय? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.