Jalna MNS protest : वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. जालना इथं चंदनझिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. सदावर्ते हे वाहनातून त्यांची पत्नी, दोन मुलींबरोबर प्रवास करत असताना, मनसे सैनिकांनी त्यांच्या वाहनावर शाई फेकली.
काही कार्यकर्त्यांनी सुपारी देखील फेकल्या. या मुळे चांगलाच गोंधळ उडाला. पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. मनसे कार्यकर्त्यांनी अचानक केलेल्या या हल्ल्यावरून पुन्हा एकदा राज ठाकरेंविरुद्ध गुणरत्न सदावर्ते यांच्यात राजकीय वाद उफाळण्याची शक्यता आहे.
बीड दौरा उरकल्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते हे जालना जिल्ह्यात गेले होते. जालना शहरातल्या विशाल काॅर्नर परिसरात त्यांचा वाहनाचा ताफा आला. गुणरत्न सदावर्ते यांना पोलिस बंदोबस्त आहे. मनसेचे (MNS) जालना शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे आणि कार्यकर्ते तिथं दबा धरून बसले होते.
गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या वाहनांचा ताफा विशाल काॅर्नर परिसरात येताच, त्यांच्या वाहनांवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकण्यास सुरवात केली. पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याअगोदर काहींनी लगेचच सुपाऱ्या फेकल्या. मनसे कार्यकर्त्यांनी यावेळी गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली.
मनसे सैनिकांनी अचानक शाई आणि सुपारी फेकल्याने, पोलिसांची धावपळ झाली. मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. जालना इथल्या चंदनझिरा पोलिसांकडून तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे. मनसेच्या पाच ते सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
महायुती सरकारमधील शिवसेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील परप्रांतीय रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्याची सक्तीचा निर्णय घेतला होता. त्याची एक मे रोजीपासून अंमलबजावणी होणार होती. या निर्णयाचे मनसेने जोरदार स्वागत केले होते.
राज ठाकरे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यांनी मराठी भाषा शिकण्याचे समर्थन करत, परप्रांतीय रिक्षा चालकांना चांगलेच धारेवर धरले होते. यावरून वाद उफाळला होता. गुणरत्न सदावर्ते आणि संजय निरूपम यांनी मनसेच्या भूमिकेला विरोध करताना, राज ठाकरेंवर खालच्या भाषेत टीका केली होती. संजय निरूपम यांच्याविरोधात आंदोलन करताना, त्यांच्या वाहनाची हवा देखील सोडून देण्यात आली होती.
गुणरत्न सदावर्ते यांनी थेट राज ठाकरेंना टार्गेट केल्याने, तेव्हापासून राज्यातील मनसेसैनिक आक्रमक होते. आता गुणरत्न सदावर्ते जालना इथं आले असताना, त्याचा वचपा मनसे कार्यकर्त्यांनी काढला. परंतु या हल्ल्यामुळे ठाकरेंविरुद्ध गुणरत्न सदावर्ते अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.