Kalyan Kale, Raosaheb Danve  Sarkarnama
मराठवाडा

Jalna Lok Sabha Constituency : विजय झाला तर केंद्रात मोठी संधी, नाहीतर दानवेंची घरवापसी ?

Raosaheb Danve Politics News : गावचा सरपंच, पंचायत समिती सभापती ते दोनवेळा आमदार, पाच वेळा सलग खासदार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष अन् केंद्रात दोनदा राज्यमंत्रीपद ही दानवे यांची चाळीस वर्षातील उपलब्धी.

Jagdish Pansare

Bjp Poltics : चाळीस वर्ष राजकारणात घट्ट पाय रोवून असलेले लोकसभेच्या जालना मतदारसंघाचे खासदार तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निकालाकडे अख्ख्या राज्याचे लक्ष लागले आहे. गावचा सरपंच, पंचायत समिती सभापती ते दोनवेळा आमदार, पाच वेळा सलग खासदार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष अन् केंद्रात दोनदा राज्यमंत्रीपद ही दानवे यांची चाळीस वर्षातील उपलब्धी.

दानवे यांची राजकारणात स्वतःची एक स्टाईल आहे, जी महाराष्ट्रात ओळखली जाते. केंद्रीय मंत्री म्हणून देश किंवा विदेशात असले तरी मतदारसंघावर नजर ठेवून असलेल्या दानवे यांच्या विजयातील सातत्याचे हेच रहस्य असल्याचे बोलले जाते. दांडगा जनसंपर्क आणि मतदारसंघावर मजबूत पकड या जोरावर भाजपने (Bjp) दानवे यांना लोकसभेच्या जालना मतदारसंघातून सहाव्यांदा उमेदवारी दिली. विजयाचा षटकार दानवे ठोकू शकले तर त्यांना केंद्रात मोठी संधी दिली जाणार आहे. (Jalna Lok Sabha Constituency News)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)यांनीच तसे स्पष्ट संकेत जालन्याच्या निवडणूक प्रचार सभेत दिले होते. त्यामुळे विजय मिळाला तर केंद्रात बडा नेता बनण्याची संधी, अन् पराभव झाला तर महाराष्ट्रात घरवापसी, अशी काहीशी परिस्थिती सध्या दानवे यांची झाली आहे.

भाजपच्या गॅंरटीने निवडून येणाऱ्या मतदारसंघाच्या यादीत जालन्याचा क्रमांक वरचा होता. निवडणुक प्रचारातही दानवे यांनी विरोधी महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांच्याविरोधात आघाडी घेतल्याचे चित्र होते.पण 13 मे रोजी झालेल्या मतदानानंतर विजयाचा छातीठोकपणे दावा करणाऱ्या भाजपचा आवाज काहीसा नरमला.

मतदारसंघातील अनेक विधानसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे यांना अपेक्षित मदत झाली नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. एकीकडे दानवेंना दगाफटका झाल्याची चर्चा, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे कल्याण काळे यांचा वाढलेला आत्मविश्वास त्यातून त्यांनी निकालाआधी सुरू केलेली आभार यात्रा यामुळे दानवेंचे समर्थक खचले.

रावसाहेब दानवे यांचे राजकारण, विरोधकांना चीतपट करणारी रणनिती ज्यांनी जवळून पाहिले आहे, ते आजही त्यांच्या विजयावर ठाम आहेत. मराठा आरक्षण लढ्याचा मोठा परिणाम जालना लोकसभा मतदारसंघात झाल्याचे दिसून आले आहे. सरकारच्या विरोधात मराठा समाजामध्ये असलेला रोष, मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनानूसार फिरलेली चक्र चक्रावून टाकणारे ठरत आहे.

अपक्ष मंगेश साबळे यांच्या उमेदवारीने दानवे-काळे या दोघांची झोप उडाली आहे. साबळे यांना मिळणाऱ्या मतदानावरच काळे-दानवे यांच्या जय-पराजयाचे गणित ठरणार आहे. एक्झिट पोलचा फोलपणा स्पष्ट झाल्यामुळे यावर कोणी फारसा विश्वास ठेवायला तयार नाहीत. दोघांनाही आघाडी आणि पिछाडी काही पोलमध्ये दाखवल्याने सर्वसामान्यांनी ईव्हीएमच्या पोलवरच विश्वास दर्शवत उद्या होणाऱ्या मतमोजणीकडे आपले डोळे लावले आहेत.

काळेंच्या विजयाने काँग्रेसला (Congress) जालना मतदारसंघात तब्बल तीस वर्षांनी कमबॅकची संधी मिळणार आहे. तर सलग सहाव्यांदा दानवें विजयी होण्यात यशस्वी झाले, तर पुढची दहा वर्ष हा मतदारसंघ पुन्हा भाजप आपल्या ताब्यात ठेवू शकेल, असे बोलले जाते. एकूणच दानवे विजयी झाले तर केंद्रात भक्कपणे पाय रोवतील, अन् पराभव झाला तर मात्र त्यांना पुन्हा महाराष्ट्रात पाठवले जाईल, अशी चर्चा आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT