भद्रेश भाटे
Wai Vidhansabha News : लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी वाई विधानसभा मतदारसंघात दोन्ही बाजूचे कार्यकर्ते मतदानाच्या दिवसापासूनच विजय आपलाच, असा दावा करीत आहेत. शनिवारी जाहीर झालेल्या एक्झिट पोलनंतर दोन्ही बाजूंच्या अपेक्षा उंचावलेल्या दिसत आहेत. मतदारसंघातील वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यात भाजपचे कमळ फुलणार की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी वाजणार याबाबत सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता असून त्याची गावागावात आणि समाज माध्यमावर चर्चा होताना दिसत आहे.
भाजप (Bjp) उमेदवाराने आघाडी घेतल्यास, हा ईव्हीएम घोटाळा असेल, असे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आतापासूनच म्हणू लागले आहेत. दरम्यान, सातारा लोकसभेच्या ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोडाऊनमधील सीसीटीव्ही यंत्रणा बंद पडल्याची चर्चा झाल्यामुळे, प्रसारमाध्यमातून बातम्या झळकल्यामुळे विरोधी ही कार्यकर्त्यांच्या चर्चांना पुष्टी मिळू शकते.
महाबळेश्वर तालुका पूर्वी जावळी मतदारसंघात असल्याने व आमदार शशिकांत शिंदे यांचे येथील कार्यकर्त्यांशी असलेले सख्य विचारात घेता, महाबळेश्वरमधून तुतारी आघाडी घेऊ शकते. खंडाळा तालुक्यातही औद्योगिक पट्टा असल्याने शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचे कार्यकर्ते आहेत. मात्र, आमदार मकरंद पाटील यांचे मतदारसंघातील गावागावात असलेले कार्यकर्त्यांचे नेटवर्क त्यांनी गतिमान केल्याने उदयनराजे भोसले यांना फायदा होऊ शकतो.
सत्ताधारी गटातील मोठे पक्ष असलेली भाजप व शिवसेना शिंदे गटाचे नेते अनुक्रमे माजी आमदार मदन भोसले व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात कुठेच दिसले नाहीत, अशी चर्चा मतदारसंघात आहे. पुरुषोत्तम जाधव यांनी साताऱ्याची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिळावी, यासाठी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर ते कोणत्याही जाहीर सभेत, प्रचारात, मेळाव्यात दिसले नाहीत. विधानसभा, लोकसभा निवडणूक लढविल्यानंतर पुन्हा आपल्या कामात व्यग्र असण्याची जाधव यांची पद्धत आहे. यावेळी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख असतानाही ते निवडणुकीपूर्वीच भूमिगत झाले की काय, असा प्रश्न मतदारांना पडला आहे.
पारंपरिक विरोधक आमदार मकरंद पाटील (Makrand Patil) व माजी आमदार मदन भोसले हे महायुतीचा उमेदवार विजयी झाला तर श्रेय आपल्या विरोधकांना मिळेल, या राजकीय आडाख्यामुळे, प्रचारात आघाडीवर दिसले नाहीत. शेवटच्या टप्प्यात मकरंद पाटील यांनी मोठ्या नेत्यांच्या सभा, मोठ्या शहरातून उमेदवारांसह बैठका, यावर भर देऊन डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या सभेनंतर महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते शशिकांत शिंदे यांना विजयी करण्यासाठी जोमाने कामाला लागले. मागील निवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा पराभव झाल्यामुळे त्यांचा निवडणुकीत पराभव होऊ शकतो, ही मानसिकता राष्ट्रवादी शरद पवार पक्ष कार्यकर्त्यांचे आत्मबळ वाढविणारी आहे.
निवडणूक काळात राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी, ही घोषणा लोकप्रिय झाली होती, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मकरंद पाटील यांची साद व त्याला प्रतिसाद म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कमळाला मतदान करण्याचा केलेला निश्चय, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील (Nitin Patil) यांना खासदार करण्याचे अजित पवार यांनी जाहीर सभेत दिलेले आश्वासन यांचा निकालात किती प्रमाणात प्रभाव पडतो, याची उत्सुकता ताणली गेली आहे.
(Edited By : Sachin Waghmare)