Raosaheb Danve News Sarkarnama
मराठवाडा

Jalna Loksabha Constituency : तीन पक्ष एकत्र लढले तरी दानवेंना `चकवा` देणे अशक्य..

Bjp : महाविकास आघाडीला आगामी सगळ्या निवडणुकीत अच्छे दिन येतील असे चित्र रंगवले जात आहे.

Jagdish Pansare

Marathwada : गेल्या २८ वर्षांपासून जालना लोकसभा मतदारसंघावर भाजपचे एकहाती वर्चस्व राहिले आहे. उत्तमसिंह पवार यांच्यानंतर १९९९ पासून सलग पाचव्यांदा रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) हे या मतदारसंघातून विजयी होवून लोकसभेत पोहचले आहेत. दोनवेळा केंद्रात राज्यमंत्रीपद भूषवलेल्या रावसाहेब दानवे यांनी हा लोकसभा मतदारसंघ घट्ट बांधला आहे. तगडा विरोधक तयारच होवू द्यायचा नाही, अशा पद्धतीचेच राजकारण दानवे यांनी आतापर्यंत केले आणि हेच त्यांच्या सातत्याने विजय होण्याचे कारण असल्याचे देखील बोलले जाते.

दोनवेळा आमदार आणि पाचवेळा सलग खासदार म्हणून निवडणून आलेल्या दानवे यांना येणारी २०२४ ची निवडणूक सोपी नसली तरी विजय त्यांचाच होईल अशी सद्यपरिस्थिती आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दानवे यांना (jalna) शिवसेनेचे अर्जून खोतकर यांनी आव्हान दिले होते. (Mahavikas Aghadi) पण त्यांचे हे बंड मोडून काढण्यात दानवे यांना यश आले आणि त्यांचा पाचवा विजय देखील साध्य झाला. यावेळची परिस्थिती वेगळी आहे, अर्जून खोतकर आता भाजपसोबत आहेत.

नुकत्याच झालेल्या कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीनंतर महाविकास आघाडीला आगामी सगळ्या निवडणुकीत अच्छे दिन येतील असे चित्र रंगवले जात आहे. राज्यातील काही मतदारसंघांमध्ये ते शक्य देखील आहे. परंतु जालना मतदारसंघाचा विचार केला तर हे तीन पक्ष मिळून देखील दानवेंना `चकवा` देवू शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. आघाडीमध्ये हा मतदारसंघ काॅंग्रेसच्या वाट्याला आहे. १९९१ मध्ये अंकुशराव टोपे यांनी मिळवलेला विजय सोडला तर त्यानंतरच्या सर्व निवडणुकीत काॅंग्रेसला पराभव स्वीकारावा लागला आहे.

२००९ मध्ये काॅंग्रेसच्या कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांना चांगलाच घाम फोडला होता. तेव्हा दानवे यांना अवघ्या ८ हजार ४८२ मतांनी विजय मिळाला होता. पण त्यापुढील दोन्ही लोकसभा निवडणुकीत दानवे मोठ्या फरकाने विजयी झाले होते. २०१४ मध्ये त्यांनी काॅंग्रेसच्या विलास औताडे यांचा २ लाखांहून अधिक तर २०१९ मध्ये दुसऱ्यांदा औताडे यांचा तब्बल ३ लाख ३२ हजार एवढ्या मताधिक्याने पराभव केला होता.

जालना लोकसभा मतदारसंघात येणारे भोकरदन-जाफ्राबाद, बदनापूर, सिल्लोड, पैठण, फुलंब्री आणि जालना या सहाही विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद मोठी आहे. जालना मतदारसंघात काॅंग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल वगळता बदनापूर, भोकरदन, फुलंब्री मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार आहेत, तर सिल्लोड, पैठणमध्ये सध्या सरकारमध्ये असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत. ही परिस्थिती कायम राहिली तर महाविकास आघाडीने कोणताही उमेदवार दिला, तर दानवे यांना रोखणे शक्य होणार नाही.

केंद्रातील मंत्रीपदाचा पुरेपूर वापर करत दानवे यांनी जालना मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर केलेले सिमेंट रस्ते, आणलेले उद्योग, रेल्वेची कामे त्यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. जालना लोकसभा मतदारसंघात काॅंग्रेसचा सातत्याने पराभव होत असल्याने या जागेवर राष्ट्रवादी दावा सांगण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यात राजेश टोपे यांना बढती दिली जावू शकते. टोपे हे चांगले उमेदवार होवू शकतात, मात्र दानवे यांचा पराभव करणे त्यांना देखील शक्य होणार नाही.

भाजपकडे दानवे यांच्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने २०२४ मध्ये तेच उमेदवार असणार हे निश्चित मानले जाते. इतर कुठल्याही विधानसभा मतदारसंघात कमी-जास्त झाले, तर त्याची कसर सिल्लोड-सोयगांव हा अब्दुल सत्तार यांचा मतदारसंघ भरून काढतो हा आजपर्यंतचा इतिहास आहे. सत्तार-दानवे यांची पडद्यामागील मैत्री लोकसभा निवडणुकीत अधिकच खुलते. त्यामुळे हा मतदारसंघ काॅंग्रेसने लढवला काय? किंवा राष्ट्रवादीने भाजपला इथे शह देणे एवढे सोपे नाही. महाविकास एकत्र लढल्यास दानवेंना विजयासाठी अधिक मेहनत घ्यावी, लागेल एवढे मात्र निश्चित.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT