Jalna Politics News: जालना महानगर पालिकेत काँग्रेस पक्षाचे नऊ नगरसेवक निवडून आले होते. पण या नगरसेवकांवर ना खासदार कल्याण काळे यांचा अंकुश होता, ना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांचा. परिणामी या पैकी सात नगरसेवकांनी स्वीकृत सदस्य पदाच्या निवडीत थेट भाजपाशी हातमिळवणी केली. याचा फटका काँग्रेसच्या वाट्याला येणारे एकमेवक स्वीकृत सदस्य पदही गेले.
काँग्रेस नगरसेवकांच्या या मनमानी कारभाराला लगाम घालून एक संदेश देण्याच्या दृष्टीने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट या सात नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करत दणका दिला. या कारवाईने जिल्हा काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. स्वीकृत सदस्य पदाच्या निवडीवेळी गटनेते फारूक सादीक तुंडीवाले यांच्या नेतृत्वाखाली सात नगरसेवकांनी थेट भाजपाला मदत करण्याची भूमिका घेतली. पक्षाचा व्हीप, नेत्यांचे आदेश धाब्यावर बसवत बेफामपणे वागलेल्या या नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करा, अशी मागणी केली जात होती.
काँग्रसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले होते. नगरसेवकांनी व्हीप नाकारत भाजपाला मदत केल्यानंतर देशमुख यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देतांना आपण या नगरसेवकांना निलंबित करण्याची मागणी प्रदेशाध्यक्षांकडे करणार असल्याचे सांगीतले होते. या संदर्भातील सविस्तर अहवाल देशमुख यांनी प्रदेशाध्यक्षांकडे पाठवला होता. त्यानंतर या सर्वांना निलंबित करण्यात आल्याचे आदेश हर्षवर्धन सपकाळ यांनी आज काढले.
पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांच्या स्वाक्षरीचे पत्र आज जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांना प्राप्त झाले. त्यानूसार फारूक सादीक तुंडीवाले, इम्रान खान अमानुल्ला खान, फरहान अ. रऊफ अंसारी, सुनील अशोक बोराडे, मयुरी दिनेश देने, रुबीना माजीद पठाण, अनिल अशोक तिरुखे यांना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आले आहे.
जालना महानगर पालिकेमध्ये स्वीकृत सदस्य नियुक्ती करते वेळस भारतीय जनता पक्षाला उघडपणे मदत केली व पक्षशीस्तीचा भंग केला, असे चौकशी अहवालावरून स्पष्ट झाले आहे. ही बाब लक्षात घेता प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून वरील सर्व सात सदस्यांना काँग्रेस पक्षातून पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात येत असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.