

Pune News: सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मोठा वाद निर्माण झाला आहे. आता ही निवडणूक पुन्हा घेण्यात यावी, अशी याचिका पुणे विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात दाखल करण्यात आली आहे. निवडणुकीत जिल्हाधिकाऱ्यांनी नियमबाह्य पद्धतीने काम केल्याचा आरोप करत विरोधकांनी ही याचिका दाखल केली आहे.
या निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यात चांगलाच संघर्ष पाहायला मिळाला होता. निवडणुकीदरम्यान पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाचे आदेश दिले होते. नंतर दोशी यांनी रजा घेतली.
आता याबाबत ॲड. दत्तात्रय घोडके यांनी याचिका दाखल केली आहे. यात विरोधी पक्षातील उपाध्यक्ष व अध्यक्ष पदाच्या उमेदवारांचा समावेश आहे. याचिकाकर्त्यांमध्ये जिल्हा परिषद सदस्य मनीषा फडतरे, अशोक पाटील, संदीप मांडवे आणि अनिल देसाई यांचा समावेश आहे.
ॲड. घोडके म्हणाले, “सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणूक पुन्हा घेण्यात यावी, यासाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात याचिका दाखल केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी उच्च पीठासीन अधिकारी म्हणून चुकीचे काम केले. नियम पाळले नाहीत. महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे की, नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी दिलेला वेळ पाळला गेला नाही.६५ सदस्यांना दुपारी १२ वाजता वेळ सुरू होणार असल्याचे सांगितले, मात्र मीटिंग ११ वाजताच सुरू झाल्याचे नमूद करण्यात आले.”
घोडके म्हणाले, “अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक कशी घ्यावी यासाठी सर्व नियम आहेत. इतर सर्व जिल्हा परिषदांनी ते नियम पाळले, पण सातारा जिल्हा परिषदेत ते का पाळले गेले नाहीत, हे अनाकलनीय आहे. जिल्हाधिकाऱ्याने बेकायदेशीर काम केले. या विरोधात विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले आहे. विभागीय आयुक्त अपिलीय अधिकारी आहेत. ते संपूर्ण प्रकरण ऐकून योग्य निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे.”
सध्या ही याचिका विभागीय आयुक्तांच्या कोर्टात दाखल करण्यात आली आहे. त्यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.