Jalna Municipal Corporation News : जालना महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपने बहुमतासह सत्ता मिळवली. महापौर पद एसटी महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्यानंतर आता पहिला महापौर कोण होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. भाजपच्या सत्तेत माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची प्रमुख भूमिका होती. त्यामुळे पहिली महिला महापौर होण्याचा मान त्यांच्या समर्थक नगरसेविकेला मिळतो की मग दानवे यांच्या? यावरही खल सुरू आहे.
दरम्यान, महापौर निवडीच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. आज भाजपने महापालिकेतील गटनेते, प्रतोदांच्या नावांची घोषणा केली आहे. ही निवड करताना भाजपने दानवे-खोतकर या दोन्ही गटामध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. जालना महानगरपालिका गटनेते पदी महेश निकम यांची तर प्रतोद पदी रमेश गौरक्षक यांची निवड करण्यात आली आहे. भाजपकडून 41 नगरसेवकांचा गट स्थापन करण्यात आला आहे.
महापालिका निवडणुक निकालानंतर अकराव्या दिवशी भाजपने गटनेता आणि प्रतोद निवडला आहे. महानगरप्रमुख भास्कर दानवे यांचे समर्थक महेश निकम यांची गटनेतेपदी तर माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचे समर्थक रमेश गौरक्षक यांची प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे. भाजपकडून नगरसेवकांचा गट स्थापन करण्यात आला असून पहिला महापौर निवडीच्या हालचालींना आता वेग आला आहे.
महानगरपालिका निवडणुकीत भाजपने 41 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. मात्र महानगरपालिकेच्या निकालाला दहा दिवस उलटून गेले तरीही भाजपला गटनेता मिळत नव्हता. अखेर आज मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या बैठकीत भाजपकडून 41 नगरसेवकांचा गट स्थापन करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 13 क मधून निवडून आले नगरसेवक महेश निकम यांची गटनेतेपदी तर, प्रभाग क्रमांक 8 क मधून निवडून आलेले नगरसेवक रमेश गौरक्षक यांची प्रतोद पदी निवड करण्यात आली आहे.
प्रभाग क्रमांक 4 ब मधून निवडून आलेले नगरसेवक फारूक तुंडीवाले यांची काँग्रेसचा महापालिकेतील गटनेता म्हणून निवड करण्यात आली आहे. या संदर्भात काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी माहिती दिली आहे. तर शिवसेनेच्या गटनेते पदाचा निर्णय उद्या, बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार अर्जुन खोतकर यांच्या मार्गदर्शनात छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या बैठकीत ठरणार आहे. या बैठकीत शिवसेनेच्या नगरसेवकांचा गट स्थापन करण्यात येणार असल्याचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी सांगितले.
महानगरपालिकेचे महापौर पद एसटी महिलेसाठी राखीव झाले आहे. गटनेता ठरल्याने आता महापौर निवडीच्या हालचालींना देखील वेग आला आहे. 30 तारखेला महापौर ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या वंदना मगरे, अॅड. रीमा खरात-काळे, श्रद्धा साळवे, रूपा कुरील यापैकी कुणाला महापौरपदाची लॉटरी लागणार, याची उत्सुकता जालनेकरांना लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.