Vandana Magre takes oath as Jalna’s first woman Mayor after BJP secured 41 seats in the Jalna Municipal Corporation election. Sarkarnama
मराठवाडा

Jalna BJP Victory : कैलास गोरंट्याल यांनी खोतकरांना सत्तेच्या आजूबाजूलाही फिरकू दिलं नाही; जालन्यात शतप्रतिशत भाजप, महापौरपदी वंदना मगरे

Jalna Municipal Corporation Election : महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होऊ शकली नव्हती. याचा सर्वात मोठा फटका शिवसेनेला बसला, तर भाजपसाठी हा निर्णय फायद्याचा ठरला.

Jagdish Pansare

Jalna News, 06 Feb : जालना महापालिकेच्या पहिल्या महिला महापौर होण्याचा मान भाजपाच्या वंदना मगरे यांना मिळाला आहे. नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत झाल्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपने स्वबळावर बहुमतासह 41 जागा जिंकल्या.

निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होऊ शकली नव्हती. याचा सर्वात मोठा फटका शिवसेनेला बसला, तर भाजपसाठी हा निर्णय फायद्याचा ठरला. माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी राज्यात युती असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेबाहेर ठेवले आहे.

2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती असताना आमदार अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काम केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. तर माजी आमदार कैलास गोरंट्याल यांना पराभूत करून अर्जुन खोतकर यांनी विधानसभेची निवडणूक जिंकली. खोतकर आणि गोरंट्याल हे जालन्याच्या राजकारणात एकमेकांचे पारंपरिक विरोधक म्हणून ओळखले जातात.

कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश करतानाच शिवसेनेसोबत युती करू नका, मी भाजपचा महापौर बनवतो, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना दिला होता. गोरंट्याल यांनी तो शब्द अखेर खरा करून दाखवला. महापालिका निवडणुकीत सर्वाधिक 41 जागा जिंकत भाजपने शतप्रतिशत सत्ता मिळवली.

शिवसेना-भाजप युती होऊ नये, असे प्रयत्न दोन्ही बाजूंनी झाले होते. अर्जुन खोतकर यांनी तर तिसऱ्या आघाडीचा प्रयोगही सुरू केला होता. विष्णू पाचफुले यांचे नाव महापौरपदाचे आरक्षण आणि युती होण्यापूर्वीच जाहीर केल्यामुळे युतीत मिठाचा खडा पडला होता. कैलास गोरंट्याल यांनी युतीच्या बैठकीत हे मुद्दे उपस्थित केले होते.

स्वबळावर लढल्यानंतर भाजपने अनपेक्षितपणे 41 जागा जिंकत बहुमत मिळवले. या विजयात कैलास गोरंट्याल यांची प्रमुख भूमिका राहिली. 1952 पासून, म्हणजे जेव्हापासून नगरपरिषद अस्तित्वात आली, तेव्हापासून भाजपला काँग्रेस व इतर पक्षांनी कधीच सत्तेत येऊ दिले नव्हते. अखेर माजी आमदार कैलास गोरंट्याल काँग्रेसमधून भाजपात आल्यानंतरच पहिल्या महापालिका निवडणुकीत कमळ फुलले.

त्यामुळे गोरंट्याल यांच्यासोबतच आलेल्या वंदना मगरे यांची महापौरपदी वर्णी लागली. तर रावसाहेब दानवे यांचे समर्थक राजेश राऊत यांना उपमहापौरपदी संधी देण्यात आली आहे. पंधरा महिन्यांसाठी हे सत्ता वाटप असणार आहे. त्यानंतर पुन्हा या पदांवर दानवे-गोरंट्याल यांच्या समर्थकांची अदलाबदल केली जाणार आहे. एकूणच भाजपने स्वबळावर सत्ता मिळवल्यामुळे राज्यातील सत्ताधारी मित्रपक्ष शिवसेनेला महापालिकेच्या सत्तेतून बेदखल करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT