Jayant Patil-Bhausaheb Chikatgaonkar
Jayant Patil-Bhausaheb Chikatgaonkar Sarkarnama
मराठवाडा

चिकटगांवकरांच्या एकसष्टीच्या कार्यक्रमात जयंत पाटील म्हणाले, तुम्हीही विधानसभेत पाहिजे..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : वैजापूरचे माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांच्या एकसष्टीचा सोहळा आज उत्साहात पार पडला. (Aurangabad) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी या सोहळ्याला आवर्जून हजेरी लावली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांनी पुतण्यासाठी माघार घेतली आणि राष्ट्रवादीने (Ncp) स्टॅडिंग जागा गमावली.

२०१४ च्या मोदी लाटेत चिकटगांवकर यांनी वैजापूरात विजय मिळवला होता. परंतु कौटुंबिक वाद टाळण्यासाठी तरुण नेतृत्वाला संधी म्हणून भाऊसाहेब चिकटगावकर यांनी माघार घेतली आणि पुतण्या अभयला उमेदवारी द्या, अशी विनंती पक्षश्रेष्ठीकडे केली होती. पक्षानेही त्यांच्याऐवजी अभय चिकटगांवकरला उमेदवारी दिली. स्वतः शरद पवार वैजापूरात प्रचारासाठी आले, पण वैजापूरकरांना हा बदल काही पचनी पडला नाही आणि शिवसेनेने इथे कमबॅक केले.

आजच्या एकसष्टी सोहळ्यात जंयत पाटील यांनी महाविकास आघाडी आहे हे लक्षात घेऊन शिवसेनेचे आमदार प्रा. रमेश बोरणारे यांच्यासोबत तुम्हीही विधानसभेत पाहिजे, असे म्हणत भाऊसाहेब चिकटगांवकरांना शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, शिवसेनेचे महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, नांदेडचे भाजप खासदार व चिकटगांवकरांचे व्याही प्रताप पाटील चिखलीकर उपस्थित होते.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत चिकटगांवकरांनी मोदी लाटेत दणदणीत विजय मिळवला होता. पाच वर्षात मतदारसंघातील त्यांची कामगिरी देखील सरस होती. त्यामुळे २०१९ मध्ये तेच उमेदवार असतील हे निश्चित असतांना पुतण्या अभय चिकटगांवकर यांनी पक्षाकडे उमेदवारीवर दावा सांगितला. तरुण नेतृत्वाला संधी द्या, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, उमेदवारीवरून कुटुंबात वाद नको, अशी भूमिका घेत भाऊसाहेबांनी माघार घेतली आणि अभयला उमेदवारी द्या, असे सांगितले.

पक्षानेही तरुण नेतृत्वाला संधी म्हणून अभय पाटील चिगटगांवकर यांना उमेदवारी देत त्यांच्या मागे शक्ती उभी केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वैजापूरात सभा घेतली, पण मतदारांनी पुतण्याला नाकारले. विरोधी पक्षातील अंतर्गत नाराजीचा फायदा उचलत शिवसेनेने कमबॅक केले. प्रा. रमेश बोरणारे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आणि राष्ट्रवादीने हातची जागा गमावली. दरम्यान, अभय पाटील चिकटगांवकर आणि काका भाऊसाहेब यांच्यातील दुरावा अधिकच वाढला.

पक्षाने अभय पाटील यांच्यावर ग्रामीणचे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली, पण पहिल्याच निवडणुकीत आलेले अपयश आणि पक्षातंर्गत संघर्ष वाढल्याने ते बेचैन होते. अशातच त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत थेट भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी नवा घरोबा केला. पुतण्याचा हा निर्णय काकाच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर मैदानात उतरू शकतात. अर्थात तेव्हा महाविकास आघाडी कायम राहते, की मग राजकीय उलथापालथ होते यावर ते अवलंबून असणार आहे. त्यामुळे जयंत पाटील यांनी भाऊसाहेब पाटील यांच्या एकसष्टी निमित्ताने आयोजित कार्यक्रम असून देखील त्यांना बोरणारे यांच्या सोबत तुम्ही देखील विधानसभेत पाहिजे, अशा सावध शुभेच्छा दिल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT