NCP Leader Jayant Patil Sarkarnama
मराठवाडा

Congress-NCP (SP) News : पाटील-देशमुख घरोबा.. जयंतराव काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या भेटीला..

Jayant Patil went to Congress District President's house : राजाभाऊ यांच्या भोकरदन येथील "राजनिवास" या निवासस्थानी जयंत पाटील दाखल झाले. त्यांच्यासोबत माजी मंत्री राजेश टोपे देखील उपस्थीत होते. या नेत्यांमध्ये अर्धा तास विविध विषयांवर चर्चा झाली. देशमुख घराण्याशी जयंत पाटील यांचे जुने संबंध आहेत.

Tushar Patil

NCP Congress Political News : राजकारणात ऐकमेकांवर टीका, आरोप-प्रत्यारोप हा नित्याचा प्रकार असला तरी काही राजकीय घराणी आणि नेते राजकारणापलीकडची मैत्री जपतात. पक्ष, विचारधारा भिन्न असले तरी या पलीकडे माणुसकी, नातेसंबंध, मैत्रीचे नाते अधिक घट्ट असते याची प्रचिती पुन्हा एकदा आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रातांध्यक्ष जयंत पाटील सध्या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने मराठवाडा दौऱ्यावर आहेत.

काल जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे त्यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महाविकास आघाडी आहे. (NCP) नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या आघाडीने सत्ताधारी महायुतीला राज्यात जोरदार दणका दिला. याच विजयाची पुनरावृत्ती आगामी विधानसभा निवडणुकीत करण्याचा आघाडीचा प्रयत्न आहे.

त्यामुळे सध्या या तीनही पक्षाच्या राज्य व जिल्हा पातळीवरील नेत्यांमध्ये चांगलेच जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाल्याचे पहायला मिळते. जयंत पाटील यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत तालुका आणि जिल्ह्याच्या राजकारणावर चर्चा केली.

जयंत पाटलांच्या या भेटीने तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले असले तरी ही भेट राजकारणापलीकडची, नाते-संबंध जपणारी असल्याचे सांगितले जाते. या निमित्ताने पाटील-देशमुख यांच्यातील घरोब्याचे चित्रही तालुक्यात पहायला मिळाले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यात शिवस्वराज्य यात्रा काढली जात आहे. या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) काल भोकरदन शहरात आले होते. यावेळी त्यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व भोकरदन चे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत चहापान घेतले.

शिवस्वराज्य यात्रेत व्यासपीठावर राष्ट्रवादीच्या दोन गटांमधील गोंधळ, चार दिवसापूर्वी काँग्रेसच्या मेळाव्यात पक्ष निरीक्षकांत समोर जागा सोडण्याची झालेली मागणी या पार्श्वभूमीवर या भेटीचे अनेक अर्थ काढले जात आहेत.

रविवारी रात्री राजाभाऊ यांच्या भोकरदन येथील "राजनिवास" या निवासस्थानी जयंत पाटील दाखल झाले. त्यांच्यासोबत माजी मंत्री राजेश टोपे देखील उपस्थीत होते. या नेत्यांमध्ये अर्धा तास विविध विषयांवर चर्चा झाली. देशमुख घराण्याशी जयंत पाटील यांचे जुने संबंध आहेत. त्यामुळे भेटीचे आमंत्रण मिळताच त्यांनी ते तात्काळ स्वीकारले.

राजाभाऊ देशमुख यांच्या पत्नी व माजी नगराध्यक्ष मंजुषा देशमुख यांनी जयंत पाटलांचे केलेले स्वागत बघून जेवणाचे आमंत्रण दिले असते तर नीसंकोचपणे जेवायला आलो असतो, अशी मिश्किल टप्पणी करत जयंत पाटील यांनी देशमुख कुटुंबाशी आपले किती जिव्हाळ्याचे नाते आहे हे दाखवून दिले. आलो असतो असे म्हणत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यावेळी दिवंगत भाऊसाहेब देशमुख यांच्या काळातील जुन्या राजकीय आठवणींना उजाळा पाटील यांनी दिला.

ही भेट पूर्णपणे पारिवारिक व सहजच घेतलेली होती. या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही असे देशमुख यांनी भेटीनंतर स्पष्ट केले. तरी जयंत पाटील व राजाभाऊ यांची बंद दाराआड काही मिनिटांची झालेली चर्चा नेमकी काय होती?

हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. राजाभाऊ देशमुख यांचा पिढी जात असलेला राजकीय वारसा व लोकसभा निवडणुकीत माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पाडण्यात निभावलेली महत्त्वाची भूमिका यामुळे राजाभाऊ देशमुख यांचे काँग्रेस पक्षा वजन वाढले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत ही जागा काँग्रेसला सोडण्याची मागणी त्यांनी नुकत्याच झालेल्या काँग्रेस पक्षनिरीक्षकांच्या दौऱ्यात केली होती. शैक्षणिक संस्था व भोकरदन नगरपालिकेवर असलेली पंधरा वर्षाची सत्ता या जोरावर राजाभाऊ विधानसभेत एन्ट्री करू पाहत आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीच्या मेळाव्यांना असणारी गर्दी यामुळे महाविकास आघाडी साठी सध्या पोषक वातावरण आहे.

मराठा आरक्षणामुळे मतदार संघातील ढवळून निघालेले वातावरण, राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेत जयंत पाटलासमोर राष्ट्रवादीच्या दोन गटातील गोंधळ, माजी मंत्री राजेश टोपे यांच्यांशी असलेले स्नेहपूर्ण संबंध पाहता भोकरदन विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने केलेला दावा राजाभाऊ देशमुख यांच्या कितपत पथ्यावर पडतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT